बेळगाव नाट्य संमेलनाचा आज होणार समारोप

  • Share this:

Natyasamelan

बेळगाव (08 फेब्रुवारी) :  बेळगावमध्ये सुरु असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा आज अखेरचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता बेळगावमधील नाट्यसंमेलनाचा समारोप होईल.

संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र उपस्थित राहणार नाहीत, तर शिवसेनेतर्फे परिवहन मंत्री दिवाकर रावते सहभागी होणार आहेत.

काल रात्री नाट्यसंगीत आणि कलाकार रजनी पार पडली, त्याला बेळगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याशिवाय नाट्यसंमेलनाचा कालचा दिवस अनेक घडामोडींनी चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते काल नाट्यसंमेलनाचं उद्घाटन झालं.

नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला गोंधळाचं गालबोट लागलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. गोंधळाचं वातावरण अधिकच वाढल्यानं खुद्द संमेलनाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यासपीठावरुन खाली येऊन कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

नाट्यासंमेलनाला काल मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यासह सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर उभारणी, फिल्म सिटीत नाटकांसाठी राखीव जागा अशी आश्वासनं यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. मात्र बेळगावात कर्नाटककडून होत असणार्‍या मराठी भाषिकांच्या गळचेपीबाबत मुख्यमंत्र्यांनी मौन पाळणं पसंत केलं.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी एकीकरण समितीने मुख्यमंत्र्यांना बेळगाव प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात साक्षी नोंदवण्यासाठी खटल्यातल्या त्रुटी दूर करण्याची विनंतीही एकीकरण समितीनं केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2015 12:36 PM IST

ताज्या बातम्या