बाबासाहेबांचं लंडनमधील घर राज्य सरकार विकत घेणार

बाबासाहेबांचं लंडनमधील घर राज्य सरकार विकत घेणार

  • Share this:

babasaheb_home24 जानेवारी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास असलेलं लंडन येथील घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबद्दल माहिती दिली. तावडे यांनी लंडन इथं जाऊन याबाबत चर्चा केली आणि बाबासाहेबांचं घरं विकत घेण्यास राज्य सरकार तयार असल्याची माहिती टिवट्‌रवरून दिलीये. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एकाप्रकारे महामानवाचं सातासमुद्रापार स्मारक उभारलं जाणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1921-1922 असे दोन वर्षे लंडनमध्ये वास्तव्यास होते. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण पूर्ण केलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी डी.एस.सी पदवी संपादन केली. लंडनमध्येच बाबासाहेबांनी बॅरिस्टर पदवीही मिळवली. या काळात बाबासाहेबांनी लंडनमधील किंग हेनरी रोड येथील एका घरात वास्तव्य केले होते. ही ऐतिहासिक वास्तू घरमालकाने 40 कोटी रुपयांत लिलावात काढली होती. याबद्दल लंडन येथील स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ही बाब लंडन इथं कार्यरत असलेल्या फेडरेशेन ऑफ आंबेडकराईट्स अँड बुद्धिस्ट ऑर्गेनायझेशन (FABU) या संघटनेच्या सदस्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने ही वास्तू विकत घेण्यासाठी हालचाल सुरू केली. याबाबत तत्कालिन राज्याचे रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी केंद्राला पत्र व्यवहार केला होता. तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही वास्तू विकत घेण्यास होकार दिला होता. या वास्तूत बाबासाहेबांचं संग्रहालय उभारण्याचा मानस सरकारने व्यक्त केला होता. अखेर वर्षभराच्या प्रयत्नानंतर या मोहिमेला यश मिळाले आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लंडन इथं जाऊन संबंधीत व्यक्तींशी चर्चा केलीये. दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली असून आता ही ऐतिहासिक वास्तू विकत घेण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. येत्या दोन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून घर विकत घेणार आहे. शक्य झाल्यास 14 एप्रिलला ही वास्तू जनतेसाठी खुली करण्याची तयारीही राज्य सरकारने केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 03:57 PM IST

ताज्या बातम्या