ओबामा भारत भेटीला, दहशतवादी लागले घुसखोरीला !

  • Share this:

modi on obama19 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसांच्या भारत भेटीदरम्यान अभूतपूर्व अशी सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या दौर्‍यादरम्यान लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेकडून घातपात घडवला जाण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यादृष्टीने सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर आयसीसचाही भारताला धोका असल्याचा इशारा ब्रिटेननं दिलाय. भारतात या अतिरेकी संघटनेच्या कारवायांवर बारिक लक्ष ठेवण्याचा सल्लाही ब्रिटननं दिलाय.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांच्या स्वागतासाठी दिल्लीत जय्यत तयारी सुरू आहे. पण, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोएबासारख्या अतिरेकी संघटना या दौर्‍यादरम्यान घातपात घडवू शकतात, अशी शक्यता व्यक्त होतेय.

सीमेवर लष्कर-ए-तोएबाकडून वारंवार होणारी घुसखोरी थोपवण्यात आल्याचं बीएसएफच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजतंय. घुसखोरी रोखण्यासाठी 10 ते 12 अतिरिक्त तुकड्याही सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर ओबामांच्या भेटीदरम्यान अतिरेकी कारवाया केल्या तर याद राखा, असा सज्जड दम अमेरिकेनं पाकिस्तानला दिलाय.

सुरक्षा कशी कडेकोट असणार आहे ?

- 26 जानेवारीच्या आठवडाभर आधीपासूनच राजपथ लोकांसाठी बंद करण्यात येणार आहे

- 26 जानेवारीला उपस्थित राहणार्‍या मान्यवरांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रुफ काचा लावण्यात येणार आहे

- अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा, भारताची एसपीजी, एनएसजी आणि दिल्ली पोलीस यांचं 7 फेर्‍यांचं सुरक्षा कडं कार्यक्रमस्थळी असणार आहे.

- ओळखपत्राशिवाय कुठल्याच वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.

ओबामा ताजमहालालाही भेट देणार असल्यानं उत्तर प्रदेश पोलीसही विशेष खबरदारीही घेत आहेत. ओबामा भेट देतील तेव्हा ताजमहालात सामान्यांसाठी प्रवेश बंद ठेवला जाण्याचीही शक्यता आहे. काही कारणांमुळे ओबामा यांना विमानाऐवजी रस्त्यानं प्रवास करावा लागला तर तो रस्ताही सामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. एकूणच काय ओबामांसाठी सुरक्षा अत्यंत चोख असणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 10:51 PM IST

ताज्या बातम्या