खारघर टोलनाका सुरू होताच ट्रॅफिक जाम

खारघर टोलनाका सुरू होताच ट्रॅफिक जाम

  • Share this:

KHAR TOLL

06 जानेवारी :  गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला नवी मुंबईजवळचा खारघरचा टोल नाका अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला आहे. पण टोलवसुली सुरू होताच पहाटे सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड मोठा ट्रॅफिक जाम झाला. आज (मंगळवारी) सकाळपासून टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होती. दोन्ही बाजूला चार-चार किलोमीटरपर्यंत गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे अखेर टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्यात आली. दुसरीकडे रात्री उशिरा मनसेच्या कार्यकर्त्यांनी खारघर टोलनाका फोडला आहे. टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करून हे कार्यकर्ते पसार झाले. त्यानंतर टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिसूचनेनंतर त्वरित वसुली सुरू करण्याचा निर्णय सायन पनवेल टोलवेज कंपनीने घेतला आहे. हा टोलनाका सुरू झाला असला, तरी कोपरा, खारघर, कामोठे, कळंबोली व पनवेल या पाच शहरांतील वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. बीएआरसी जंक्शन ते कळंबोली जंक्शन या 25 किलोमीटरच्या आठपदरी रस्त्यासाठी ही टोलवसुली सुरू झाली आहे. 17 वर्षे आणि पाच महिने ही वसुली सुरू राहणार आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर स्पॅगेटीजवळ हा टोलनाका उभारण्यात आला आहे. मंत्रालयातून शनिवारी (ता. 3) टोलवसुलीचे आदेश निघाले. या आदेशाची प्रत सोमवारी दुपारी कंपनीला मिळाली आणि दोन महिन्यांपासून वसुलीचा केवळ सराव करणारे कर्मचारी प्रत्यक्षात वसुलीसाठी तयार झाले. रात्री बारा वाजता टोलसाठीचे बॅरिगेट्स खाली पाडून प्रत्यक्ष वसुलीला सुरुवात झाली. त्यामुळे आता पुणे, कोकण आणि गोव्यात जाणार्‍या आणि त्या मार्गावरून मुंबई-ठाण्यात येणार्‍या वाहन चालकांना आता आणखी एक टोल भरावा लागणार आहे. म्हणजे ग्राहकांवरचा टोलचा भुर्दंड आणखी वाढला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 6, 2015, 9:48 AM IST

ताज्या बातम्या