News18 Lokmat

माफ कर बळीराजा, हे वर्ष तुझं नव्हतं!

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2014 03:10 PM IST

माफ कर बळीराजा, हे वर्ष तुझं नव्हतं!

[wzslider autoplay="true"]

दिसं जातील दिसं येतील...पण दिवस कितीही सरले तरी त्या वेदना तशाच राहतात, अशाच काही बळीराजाच्या वेदना...बळीराजाच्या मनात कायमचं घर करून गेलेल्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. बारमाही शेतात जुंपलेल्या शेतकर्‍यांच्या घरात कधी डोकावून पाहिलं तर सुखाचे क्षण कमी आणि दु:खाचे ओरबाडेच जास्त दिसून येतील. सुख प्रत्येकाच्या वाट्याला यावं ही साहजिकच अपेक्षा असते. पण त्याला बळीराजा अपवाद ठरलाय. आज आपण नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलो आहोत. जर मागे वळून पाहिलं तर खूप सार्‍या वेदना, जखमा तशाच ताज्या आहेत. निदान शेतकर्‍यांच्या बाबतीत हे चुकीचं ठरूच शकणार नाही. त्याच आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न...

2013 मध्ये पावसाने दडी मारल्यामुळे अवघा महाराष्ट्र दुष्काळी संकटाने कोरडाठाक पडला होता. दुष्काळ तर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेला. त्यामुळे दुष्काळाची दाहकता सर्वात जास्त मराठवाडा आणि विदर्भाला सोसावी लागली. 2013 चा दुष्काळ कसाबसा पचवून बळीराजा मोठ्या अपेक्षेनं नव्या वर्षात स्वप्न बाळगून होता. पण शेतकर्‍यांच्या स्वप्नावर अस्मानी संकटाने पाणी फेरलं. उन्हाळ्याची सुरुवात होते न होते तोच पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा,विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. अक्षरश: टेनिस बॉल एवढ्या गारा न भूतो न भविष्यती पाहण्यास मिळाल्या. सोलापूर, बारामती, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिकमध्ये गारपिटीने थैमान घातले होते. द्राक्षं, केळी, संत्रा, आंबा, पपई, ऊस या फळपिकांसह गहू, कापूस, हरभरा, तूर, मका, ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालं. नाशकात तर सोन्यासारख्या द्राक्षबागा आडव्या झाल्यात तर मराठवाड्यात हाती कशीबशी आलेली पिकंही जमीनदोस्त झाली. हे नुकसान इथंच थांबलं नाही तर शेतकर्‍यांच्या लेकरासारखी जनावरं यात मृत्यू पावली. एखादा जीवघेणा साथीचा आजार पसरावा आणि त्यात गुरंढोरं मरावीत अशी अवस्था पाहण्यास मिळाली. शेतीधन तर गेलंच पण पशुधनंही शेतकर्‍याने डोळ्यादेखत मरताना पाहिलं. राज्यभरात हाहाकार माजवणार्‍या गारपिटीमुळे सरकारलाही धडकी भरली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. निवडणूक आयोगानेही परवानगी दिल्यामुळे बळीराजाच्या जखमेवर मलमपट्टी करता आली. केंद्राकडूनही 352 कोटींची तूटपुंजी मदत करण्यात आली. महाराष्ट्राने कधी नव्हे ते अस्मानी संकटाचं रौद्र रूप पहिल्यांदाच अनुभवलं आणि पचवलं.

गारपिटीच्या तडाख्यातून बळीराजा कसाबसा सावरला पण त्याचा पाठलाग काही अस्मानी संकटाने सोडला नाही. नेहमीसारखं मान्सूनने उशिराच हजेरी लावली. पण विदर्भात अशी हजेरी लावली की, अवघा विदर्भ पाण्यात बुडाला. अवघ्या विदर्भात अतिवृष्टीने धूमशान घातले. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. शेती, घरं, गावच्या गावं पाण्याखाली गेली. नेहमी पाण्यासाठी टंचाईग्रस्त असलेला विदर्भ यंदा अतिवृष्टीमुळे झाकोळला गेला. या अतिवृष्टीमुळे शेतीचे तर नुकसान झालेच पण साधनसंपतीचंही झालं. मराठवाड्यात मात्र समाधानकारक पावसाने हजेरी लावली त्यामुळे मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळाला. पश्चिम महाराष्ट्राला निसर्गाचा आशीर्वाद लाभल्यामुळे बळीराजा सुखावला. पण बळीराजाचे सुख काय आणि दु:ख काय हे काही वरुणराजांना पाहवले नाही. वर्ष सरत असताना पुन्हा एकदा अस्मानी संकटाने डोकं वर काढलं. उत्तर महाराष्ट्रसह मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा झोडपून काढलं. अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आतापर्यंत शेकडो शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. एकट्या मराठवाड्यात दिवसाआड दोन ते तीन शेतकर्‍यांना आत्महत्या केल्यात. हेच लोण विदर्भातही पसरले. कित्येक शेतकर्‍यांनी अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आणि डोक्यावर कर्जामुळे अक्षरश: रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. काहींनी शेतात विष पिऊन तर काहींनी आपल्याच वावरात गळफास घेऊन जीवन संपवले. धक्कादायक म्हणजे यात लग्न होऊन दोन चार वर्ष झालेल्या तरुण शेतक र्‍यांची संख्या मन सुन्न करणारी होती.

नव्या भाजप सरकारने आजपर्यंत विरोधात बसून मागणीसाठी जोर लावला होता त्याची आठवण ठेवत तातडीने 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. आता त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा खरं. पण, जे गेलं ते परत येणार नाही.

Loading...

तीव्र पाणी टंचाई, गारपीट, अवकाळी पावसाशी दोन हात करून कशीबशी मोठ्या हिंमतीने शेतकर्‍यांनी पिकं पेरली. ते कुणाच्या आश्वासन अथवा सरकारी पॅकेजच्या मदतीवर नाही. स्वत:च्या पोटासाठी आणि आपल्या लेकरांना दोनवेळचा घास व्यवस्थित मिळावा यासाठी... पण अवघ्या वर्षभरात या लाखाच्या पोशिंद्याची सरकारकडून अवहेलनाच झाली आणि निसर्गानेही दया दाखवली नाही, त्यामुळेच हे वर्ष बळीराजाचं नव्हतंच असंच म्हणावं लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2014 11:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...