मोहन जोशींचा ड्रामा, बेळगावचा प्रश्न नकोसा!

मोहन जोशींचा ड्रामा, बेळगावचा प्रश्न नकोसा!

  • Share this:

Mohan joshi

11 डिसेंबर : वादग्रस्त वक्तव्यामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी अडचणीत आले आहेत. बेळगावमध्ये होणार्‍या नाट्य संमेलनात सीमाप्रश्नाचा विषय मांडणार नसल्याचे मोहन जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद गुरुवारी बेळगावमध्ये उमटले. नाट्य परिषदेच्या ऑफिससमोर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली असून, 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान होणारे नियोजित नाट्य संमेलन घेणं आपल्याला शक्य नाही, असा ठराव गुरुवारी परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

नाट्य परिषदेच्या बैठकीमध्ये जोशी यांच्या भूमिकेचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. जोशी यांनी सीमाभागातील मराठी भाषकांबाबत जे वक्तव्य केले आहे, त्याच्याशी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा सहमत नाही, जोशी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तातडीने माफी मागावी, असे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर जोशी यांच्या वक्तव्यामुळे 6 ते 8 फेब्रुवारीला बेळगावमध्ये होणारे नियोजित नाट्य संमेलन घेणे आम्हाला शक्य नाही, असाही ठराव मंजूर करण्यात आला.

बेळगावमध्येच झालेल्या पत्रकार परिषदेत जोशी यांनी सीमाप्रश्नाचा ठराव बेळगाव नाट्य संमेलनात मांडणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. हे कलावंतांचं संमेलन आहे, त्यामुळे हा विषय त्या व्यासपीठावर मांडता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. राजकारण्यांच्या संमेलनात कलावंतांविषयीचे ठराव मांडण्यात येतात का, असा प्रश्नही त्यांनी पत्रकारांना विचारला होता. सीमाप्रश्नाबद्दल आम्हाला काय वाटते ते दाखविण्याची नाट्य संमेलन ही जागा नाही, असंही ते म्हणाले होते. त्याचबरोबर बेळगाव प्रश्नाबद्दल तळमळ आणि कळकळ दाखवणं हे माझं काम नाही असंही ते म्हणाले होते. मोहन जोशींनी केलेल्या याच वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फोडलं असून सीमावासियांनी तीव्र निषेध केला.

Follow @ibnlokmattv

First published: December 11, 2014, 1:25 PM IST

ताज्या बातम्या