जव्हारमध्ये पोलिसांच्या दहशतीमुळे पुजार्‍याची आत्महत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2014 02:17 PM IST

जव्हारमध्ये पोलिसांच्या दहशतीमुळे पुजार्‍याची आत्महत्या

javhar08 डिसेंबर : जव्हार तालुक्यातील एका आदिवासी पुजार्‍याने पोलिसांच्या दहशतीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. 60 वर्षीय नवशा बिंबड खुताडे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं आदिवासी समाजात संताप व्यक्त होतोय. स्थानिकानी हा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिलाय. रुग्णालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांवर नोंदवावा, या मागणीसाठी शेकडो आदिवासींनी पोलीस स्टेशनला घेराव घातलाय.

जव्हार तालुक्यात एका महिन्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत होते. आदिवासी समाजातल्या अनेकांना पोलीस मारहाणही करत होते. त्यांनी पुजारी असलेल्या नवशा खुताडे यांनाही बेदम मारहाण केली. त्यामुळे अपमान झाल्याच्या भावनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा गावकर्‍यांनी केलाय. पोलिसांच्या मारहाणीनं खुताडे घाबरले, त्यांचा अपमान झाल्याची त्यांची प्रबळ भावना होती. पोलीस पुन्हा येऊन आपल्याला मारतील या भीतीनं त्यांनी आठवड्याभरापूर्वी जंगलात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणावरुन आदिवासी समाज प्रचंड संतप्त झालेला असून पोलिसांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली. दोषी पोलिसांवर गुन्हा नोंदवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यानं जव्हारमध्ये तणावाचं वातावरण आहे. आसपासचे मोखाडा, विक्रमगडचे पोलीस तसंच दंगलनियंत्रण पथक जव्हारमध्ये दाखल झालंय. जव्हारच्या ग्रामीण रूग्णालयात आत्महत्या केलेल्या नवशा खुताडे यांचा मृतदेह आणण्यात आलाय. पण नातेवाईकांनी अजूनही मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. वातावरण अधिक तापू नये म्हणून जव्हार ग्रामीण रूग्णालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2014 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...