शिवसेना-भाजप एकत्र येणार ?

शिवसेना-भाजप एकत्र येणार ?

  • Share this:

bejp_meet_uddhav_thacakrey28 नोव्हेंबर : अखेर शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चेला सुरुवात झालीये. शिवसेनेनं आता सत्तेत सहभागाबद्दल संकेत दिले आहे अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली. शिवसेनेनं भाजपकडे 10 मंत्रिपदं, 6 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदांची मागणी केलीये. शिवाय अनिल देसाईंची केंद्रात स्वतंत्र कार्यभार असलेल्या मंत्रिपदी वर्णी लागण्याचीही शक्यता आहे. भाजप नेत्यांसोबत 'मातोश्री'वर बैठकीनंतर सह्याद्रीवर पुन्हा एक बैठक झाली. सेनेचे नेते अनिल देसाई, सुभाष देसाई, अनंत गीते यांची धर्मेंद्र प्रधानांशी चर्चा केली. या चर्चेत अखेरीस सकारात्मक तोडगा निघाल्याचं कळतंय. उद्या सेनेच्या सत्ता सहभागावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजपने सरकार स्थापन केलं खरं पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे जनतेचा रोष ओढावून घेतला. अखेरीस याची उपरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत आमची युती 25 वर्षांची होती. एनडीए सरकारमध्ये सुद्धा शिवसेना सहभागी आहे. त्यामुळे शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं अशी इच्छा व्यक्त करत चर्चेला सुरुवात करणार अशी घोषणा केली. ठरल्याप्रमाणे पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होते.

मातोश्रीवर चर्चा निष्फळ

दुपारीच धर्मेंद्र प्रधान दिल्लीवरुन मुंबईत दाखल झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यालयात इतर नेत्यांसोबत बैठक झाली. बैठक आटोपून धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील मातोश्रीकडे रवाना झाले. संध्याकाळी सहाच्या सुमारास मातोश्रीवर भाजपच्या दोन्ही नेत्यांसह उद्धव ठाकरेंची बैठक सुरू झाली. उद्धव यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा झाली. याबैठकीत सेनेनं गृहमंत्रिपदाची मागणी केलीय. बैठक आटोपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. पण दोन्ही नेते दिल्लीला जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे अहवाल सादर करणार असं ठरलं.

शिवसेनेकडूनही एक पाऊल पुढे

धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील 'मातोश्री'वरून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या गोटात वेगवान घडामोडी घडल्यात. या बैठकीनंतर महापौर बंगल्यावर शिवसेना नेत्यांची अर्धातास बैठक झाली. उद्धव ठाकरे, अनंत गीते, सुभाष देसाई बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर अनिल देसाई, सुभाष देसाई, अनंत गीते यांची यांनी 'सह्याद्री'वर जाऊन धर्मेंद्र प्रधानांशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेनं 10 मंत्रिपदं, 6 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रिपदांचा प्रस्ताव मांडलाय. शिवाय अनिल देसाईंची केंद्रात स्वतंत्र कार्यभार असलेल्या मंत्रिपदी वर्णी लागावी अशी अटही घालण्यात आली. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली नाही. मात्र सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत सेनेला कोणती खाती हवी आहे यावर चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे 30 किंवा 1 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षांनी चर्चेत वेळ न वाया घालवता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. उद्या शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत पुन्हा चर्चा होऊन अखेरचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 28, 2014, 11:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading