20 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये दलितांवर होणार्या वाढत्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी अहमदनगर जिल्हा दत्तक घेण्याचे ठरविले आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना मनामनात रुजविण्याचा हा एक पथदर्शी प्रयोग असेल, असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितलं आहे.
अहमदनगरमधल्या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाला 1 महिना पूर्ण झाला, आरोपी मात्र अजूनही मोकाटच आहेत. या प्रकरणी तपास करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. पण तरीही तपासात फारशी प्रगती झाली नसल्याचं समोर आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून दलितांवर होणार्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अंनिसनं पाऊल उचललं आहे.
आदिवासी समाजातील 'डाकिण' या स्त्रियांच्या शोषणाच्या भीषण प्रकाराविरोधात जनजागृती करण्यासाठी अंनिसने नंदुरबार जिल्हा दत्तक घेतला. गेल्या 4-5 वर्षांत त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. जातपचांयतीच्या विरोधातही अंनिसने प्रबोधनाची चळवळ सुरू केली आहे. राज्यात सध्या घडणार्या जातीय अत्याचाराच्या विरोधात तसाच एखादा प्रयोग करावा, असे अंनिसच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यानुसार नगर जिल्हा दत्तक घ्यायचा आहे. जातीय अत्याचाराला सामाजिक न्यायाची प्रस्थापना हेच उत्तर असू शकते. त्यासाठी शिक्षक, ग्रामस्थ, प्रशासन, पोलीस, सामाजिक संघटना, यांच्या सहभागातून हा प्रयोग यशस्वी करायचा अंनिसचा प्रयत्न आहे.
Follow @ibnlokmattv |