IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील चार नावं उघड

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील चार नावं उघड

  • Share this:

ipl_srinivasan_and_meiyappan_binny14 नोव्हेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज (शुक्रवारी) सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल देत मुकुल मुदगल समितीचा अहवालाचा भाग दोन्ही बाजूंच्या वकिलांना देणार असल्याचा निर्णय जाहीर केलाय. तसंच या अहवालातील 13 पैकी 4 जणांची नावं आता उघड झाली आहे. यामध्ये एन.श्रीनिवासन, सुंदर रमन, राज कुंद्रा आणि गुरूनाथ मयप्पन यांची नावं घेण्यात आली आहेत. तर ओवेश शहा आणि स्ट्युअर्ट बिन्नीबरोबरच इतर 5 खेळाडूंच्या नावाचाही या अहवालात समावेश आहे. दोन्ही बाजूंना कोर्टाने या अहवालातील महत्वाच्या भागाची प्रत दिलीये. त्यानुसार आता 24 नोव्हेंबरला पुढील सुनावणी दरम्यान युक्तिवाद केला जाईल. अहवालात नावं आलेल्या सर्वांना पुढील 4 दिवसांत आपल्या हरकती किंवा आपलं म्हणणं मांडायचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. 20 नोव्हेंबरला होणारी बीसीसीआयची सर्वसाधारण सभाही त्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे बोर्डाची एजीएम डिसेंबर किंवा जानेवारीत होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात जस्टिस मुकुल मुद्गल यांनी सुप्रीम कोर्टाला बंद लिफाफ्यात आपला अहवाल सादर केला होता. पण हा संपूर्ण अहवाल आपण वाचला नसल्याचं सांगत कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली होती. त्याचबरोबर लिफाफ्यात नमुद केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली जाऊ नये यावर दोन्ही बाजूच्या वकीलांचं एकमत झालंय.पण सुप्रीम कोर्टाने यावर काहीही भाष्य केलं नाहीये. 20 नोव्हेंबरला बीसीसीआयची निवडणूक होतेय. जर मुद्गल समिती अहवालात श्रीनिवासन यांचं नावं नसेल तर या निवडणुकीत श्रीनिवासन यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी बोर्डाकडून केली गेली होती. पण कोर्टाने याप्रकरणी थेट निरिक्षण देणं टाळलंय.  आज या प्रकरणावर कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. आजपर्यंत बंद लिफाफ्यात असलेला अहवाल आता कोर्टाने वकिलांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या अहवालात बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन आणि त्यांचा जावई गुरूनाथ मयप्पन, राजस्थान रॉयलचे मालक राज कुंद्रा यांच्यासह सुंदर रमन, ओवेश शाह आणि स्टुअर्ट बिन्नी या क्रिकेटरची नाव असल्याचं स्पष्ट झालंय.

 आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी याबद्दल ट्विट केलंय. मोदी म्हणतात,

"आज फार मोठा दिवस आहे. सुप्रीम कोर्टासमोर पैशाची आणि माफियांची सत्ता मोठी नाही हे समोर आलं. नेहमी सत्याचा विजय होतो. थँक यू जस्टिस मुद्गल. तुम्ही खर्‍या अर्थाने क्रिकेटचे तारणहार आहात. आयसीसी, बीसीसीआय, एशन या सगळ्याची स्वच्छता करण्याची गरज आहे. या अहवालात नावं असलेल्या सगळ्यांना तुरुंगात डांबायला हवं. आतापर्यंत यात लोकांचा किती पैसा गेला हेही तपासायला हवं."

 आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा घटनाक्रम

 16 मे 2013 :

- गैरव्यवहार आणि फसवणुकीप्रकरणी 3 खेळाडूंना अटक

- दिल्ली पोलिसांनी केली कारवाई

- बीसीसीआयनं केलं राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंना निलंबित

- बुकी आणि खेळाडूंचं संभाषण पोलिसांच्या हाती

17 मे 2013 :

- श्रीसंतनं केलेल्या सगळ्या जाहिराती राजस्थान रॉयल्स टीमच्या स्पॉन्सर्सनं काढून टाकल्या

 20 मे 2013 :

- राजस्थान रॉयल्सनं तीनही खेळाडूंचा करार केला रद्द

21 मे 2013 :

- येऊ घातलेली आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

22 मे 2013 :

- बीसीसीआयवर क्रीडा खात्याचं नियंत्रण यावं ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल

 23 मे 2013 :

- मुंबई पोलिसांची टीम चेन्नईत दाखल

- चेन्नई सुपर किंग्जच्या गुरुनाथ मय्यप्पनला चौकशीसाठी बोलावलं

24 मे 2013 :

- मय्यप्पनला मुंबई पोलिसांनी केली अटक

- 'मय्यप्पन चेन्नई टीमचा मालक नाही', चेन्नई सुपर किंग्जचं स्पष्टीकरण

26 मे 2013 :

- चौकशी निष्पक्षपातीपणे होण्याची श्रीनिवासन यांनी दिलं आश्वासन

- श्रीसंत आणि अंकित चव्हाणनं जामीनासाठी अर्ज केला

- बीसीसीआयनं नेमली 3 जणांची चौकशी समिती

28 मे 2013 :

- श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या मागणीनं धरला जोर

- श्रीसंतची न्यायालयीन कोठडीत रवानगी

 29 मे 2013 :

- चौकशीपासून श्रीनिवासन यांना दूर राहण्याचे कोर्टाचे आदेश

30 मे 2013 :

- बीसीसीआयमध्ये श्रीनिवासनविरोधी सूर

- बोर्डात राजीनामासत्र

31 मे 2013 :

- संजय जगदाळे (सचिव) आणि अजय शिर्के (खजिनदार) यांनी पदांचा दिला राजीनामा

1 जून 2013 :

- राजीव शुक्ला यांनी दिला IPL चेअरमनपदाचा राजीनामा

2 जून 2013 :

- श्रीनिवासन अध्यक्षपदावरुन तात्पुरते पायउतार

- जगमोहन दालमिया बनले अंतरिम अध्यक्ष

6 जून 2013 :

- राज कुंद्रांनी बेटिंग केल्याचं केलं मान्य

- कुंद्रा राजस्थान रॉयल्सचे सहमालक

11 जून 2013 :

- श्रीसंत आणि चव्हाण यांची जेलमधून सुटका

- सिद्धार्थ त्रिवेदीवर निलंबनाची कारवाई

21 जून 2013 :

- बिहार क्रिकेट असोसिएशनने दाखल केली बोर्डाच्या चौकशी समितीविरोधात याचिका

30 जून 2013 :

- मुंबई हायकोर्टाचा बीसीसीआयला दणका

- बीसीसीआयची चौकशी समिती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा दिला निर्वाळा

5 ऑगस्ट 2013 :

- मंुबई हाय कोर्टाच्या निर्णयाविरोधात बीसीसीआयची सुप्रीम कोर्टात धाव

7 ऑगस्ट 2013 :

- सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती देण्यास दिला नकार

 28 ऑगस्ट 2013 :

- रवी सवानींनी बीसीसीआयला सादर केला आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा रिपोर्ट

30 ऑगस्ट 2013 :

- सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय, श्रीनिवासन, इंडिया सिमेंट्स आणि राजस्थान रॉयल्सला बजावली नोटीस

13 सप्टेंबर 2013 :

- श्रीसंत आणि अंकित चव्हाणवर बोर्डाने घातली आजन्म बंदी

21 सप्टेंबर 2013 :

- गुरुनाथ मय्यप्पनविरोधात फसवणूक, कट कारस्थानाचे गुन्हे दाखल

29 सप्टेंबर 2013 :

- श्रीनिवासन यांची पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड

8 ऑक्टोबर 2013 :

- सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना दिली अध्यक्षपद भुषवण्याची परवानगी

- सुप्रीम कोर्टान जस्टिस मुकुल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली केली चौकशी समितीची स्थापना

19 जानेवारी 2014 :

- मुदगल समितीने घेतली सौरव गांगुली आणि दालमियांची भेट

10 फेब्रुवारी 2014 :

- मुदगल समितीच्या अहवालात गुरुनाथ मय्यप्पनवरील आरोप सिद्ध

- मुदगल समितीने काही बड्या भारतीय खेळाडूंच्या चौकशीसाठी मागितली परवानगी

18 मार्च 2014 :

- महेंद्रसिंग धोणीनं आपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मद्रास हायकोर्टाने घेतली धाव

21 मार्च 2014 :

- बीसीसीआय आणि आयसीसीनं एकत्रित आयपीएल अँटी करप्शन समिती केली स्थापन

25 मार्च 2014 :

- श्रीनिवासन यांनी सुप्रीम कोर्टाने दिला दणका

- श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

 28 मार्च 2014 :

- सुनील गावसकरांकडे आयपीएल अध्यक्षपदाची धुरा

- शिवलाल यादव यांच्याकडे बीसीसीआय अध्यक्षपदाची मदार

9 एप्रिल 2014 :

- बीसीसीआयने मुदगल समितीसमोरील धोणीचा जबाब देण्याची केली मागणी

20 एप्रिल 2014 :

- बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीवरुन श्रीनिवासन यांची उचलबांगडी

29 एप्रिल 2014 :

- बीसीसीआयनं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नवीन चौकशी समितीची केली मागणी

29 ऑगस्ट 2014 :

- मुदगल समितीनं सादर केला अंतरिम अहवाल

 3 नोव्हेंबर 2014 :

- मुदगल समितीनं सादर केला अंतिम अहवाल

 

Follow @ibnlokmattv

First published: November 14, 2014, 5:29 PM IST

ताज्या बातम्या