08 नोव्हेंबर : कापसाला 4050 रुपयांचा हमीभाव देण्याचा निर्णय राज्यातल्या भाजप सरकारनं घेतला आहे. दुष्काळी विभागांना विशेष पॅकेज दिलं जाणार आहे. मात्र अंतिम निर्णय पीक आणेवारी आल्यावर घेणार असा निर्णय झाल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. मत्स्यव्यवसाय विकास, नवी कृषी विमा पद्धती आणि देशी पशूधन वाढीवर विशेष भर याही बाबींवर सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे असंही खडसेंनी सांगितलं.
दरम्यान, कापसाला 7 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जळगाव तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. याला जळगाव जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकर्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. जळगाव जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा आला, त्यामुळे पेरणी उशिरा करावी लागली. त्यातच अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातल्या कापसासह अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करता येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. तर हमी भावापेक्षा कमी दराने कापसाची विक्री होत असल्यानं यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच दिवशी शेतकर्यांनी खरेदी बंद पाडली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा