'फोर्ब्स'च्या यादीत मोदी 15वे तर पुतीन अव्वल

  • Share this:

Narendra Modi

06 नोव्हेंबर : जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा समावेश झाला आहे. 'फोर्ब्स' मासिकाने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली असून या यादीत मोदींनी 15 वे स्थान पटकावले आहे. त्यांच्याशिवाय मुकेश अंबानी, लक्ष्मी मित्तल तसेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचादेखील या यादीत समावेश करण्यात आला आहे.

फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत 72 जणांचा समावेश करण्यात आला आहे. प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सलग दुसर्‍यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिसर्‍या क्रमांकावर चीनचे नेते ली जिनपिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना प्रथमच या यादीमध्ये स्थान देण्यात आले असून ते जगातील 15 वे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले आहेत.

'सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचा नवा रॉकस्टार जो बॉलिवूडमधला नाही तर तो भारताचा नवनिर्वाचित पंतप्रधान असल्याचं 'फोर्ब्स'ने म्हटलं आहे. मोदींनी गांधी घराण्याचा पराभव करत देशात भाजपची सत्ता आणण्यात मोठं योगदान केलं आहे.' 'फोर्ब्स'ने मोदींचा 'हिंदू राष्ट्रवादी' म्हणून उल्लेख केला आहे.

दरम्यान, यंदाच्या यादीत 12 नव्या व्यक्तींचा समावेश झाला आहे, यात 'अलिबाबा'चे संस्थापक आणि चीनचे सर्वात श्रीमंत नागरिक जॅक मा हे तिसाव्या क्रमांकावर आहेत तर इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल अलसीसी सामील झाले आहेत. रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी 36, आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल 57, तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला 64 वा क्रमांक पटकावला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 09:37 AM IST

ताज्या बातम्या