घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

  • Share this:

devendra_fadanvis_intierview01 नोव्हेंबर :सर्व घोटाळ्यांची चौकशी होणार, सर्व फाईली पुन्हा उघडणार...जर कुणी दोषी आढळलं तर जिथे जिथे जे जे करणं आवश्यक ते नक्की करणार मग तो कोणता पक्षाचा एक्स नावाचा नेता असेल किंवा कुणीही असेल त्याची हयगय केली जाणार नाही असा थेट इशारा राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तसंच शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे लवकरच निर्णय जाहीर होईल असंही फडणवीस यांनी सांगितलं. त्याचबरोबर छोट्या राज्यांची आमची भूमिकाच आहे आणि ती भूमिका कायम असणार आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. आमचे आयबीएन लोकमतचे न्यूज एडिटर आशिष दीक्षित यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास गप्पा मारल्यात. यावेळी त्यांनी आपला अजेंडा जाहीर केला.

...तर महाराष्ट्र दिवाळखोरीकडे जाईल

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली याचं दडपण आहे पण समोर असलेल्या आव्हानाचा डोंगर खूप मोठा आहे. त्यामुळे राज्याच्या हितासाठी मोठी जबाबदारी जनतेनं आमच्यावर सोपवली आहे. गेल्या 15 वर्षात महाराष्ट्र ज्या पद्धतीने बदलायला हवा होता तसा बदलेला नाही. एखादे राज्य जर मागे पडले तर त्याची परतफेड भावी पिढीला फेडावी लागते. आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. आघाडी सरकारने जाता-जाता खूप सार्‍या घोषणा केल्या आहेत, जर त्या घोषणांची पूर्तता करायची असेल तर महाराष्ट्राला 52 हजार कोटींचं कर्ज घ्यावे लागेल. आजपर्यंत जे राज्यात घडले नाही ती राज्याची महसुली तूट 26 हजार कोटींवर जाईल. त्यामुळे एकाप्रकारे महाराष्ट्र दिवाळखोरीकडे जाईल अशी चिंता फडणवीस यांनी व्यक्त केली. आघाडी सरकारने अनेक घोषणा केल्यात पण अंथरून पाहून पाय पसरायचे असते हे मात्र ते विसरले. त्यामुळेच राज्याच्या विकासासाठी नवी पायाभरणी, आराखडा तयार करावा लागेल असंही फडणवीस म्हणाले.

काय आहे टार्गेट ?

नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे 100 दिवसांचे टार्गेट दिले होते तसं काही करण्याचं अजून ठरलेलं नाही, पण त्याबद्दल विचार करुन निर्णय घेईलच पण आमचं टार्गेट हे पाच वर्षात महाराष्ट्राचा कायापालट करायचं आहे. माझ्या सर्व सहकार्‍यांना सांगितलं आहे की, प्रत्येक गोष्ट ही आव्हान म्हणून स्वीकारा, जेव्हा आपण एखादं आव्हान प्रामाणिकपणे स्वीकारू तेव्हा ते काम नक्की होणार असा निश्चिय केला तर कोणतीही गोष्ट बदलण्यास वेळ लागणार नाही. असा कानमंत्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकार्‍यांना दिला.

'घोटाळेबाज नेत्यांची हयगय होणार नाही'

सर्व घोटाळ्यांच्या फाईल पुन्हा उघडल्या जातील. जिथे जिथे राज्याच्या हितासाठी,जनतेचा पैसा भ्रष्टाचारात गेला आहे, तिथे कारवाई केली जाईल. आम्ही व्यक्ती निरपेक्ष काम करणार आहोत. त्यामुळे ज्याचा दोष असेल त्याच्यावर कारवाई होणारच. मग तो कोणत्या पक्षा एक्स, वाय किंवा झेड नावाचा नेता असेल याचा विचार आम्ही करणार नाही. दोषी आढळल्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करणार नाही कुठेही कारवाईसाठी विलंब होईल असं होणार नाही जे कायद्याच्या बाजूने आहे, त्यानुसार पूर्ण कारवाई होईल असा थेट इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

'बाळासाहेबांविषयी नितांत आदर, शिवसेनासोबत येईलच'

शिवसेना आमच्यासोबत असो किंवा नसो, पण बाळासाहेब ठाकरे हे आमच्या करीता नेहमीच पुज्यनिय असतील. कारण आमच्याकरीता ते युती असताना आणि नसताना पितृतुल्य होते. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे आणि तो आम्ही कधीच कमी केला नाही. त्यामुळेच आज बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी गेलो होतो. राहिला शिवसेनासोबत येणाचा प्रश्न तर शिवसेना नक्की सोबत येईल याबद्दलचा निर्णय लवकरच होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

'राज्य वेगळे करू नका, राज्याची निर्मिती करा'

भारतीय जनता पक्षाची छोट्या राज्याची भूमिकाही तत्वनिष्ठ आहे. आम्ही जेव्हा छत्तीसगडची निमिर्ती केली. मध्यप्रदेशही विकसित झाला आणि छत्तीसगडही विकसित झाला. आम्ही झारखंडची निर्मिती केली तेव्हा, बिहार आणि झारखंडही विकसित झाला. आज जरीही झारखंड, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवार्‍या होत असतील पण तिथे आता विकासाचं राजकारण करता येत आहे. पूर्वी तिथे तसं नव्हतं. आज उत्तरखंड वेगळं केलं, त्याचा विकास झालाय. त्यामुळे छोटे राज्य करणे, वेगळे करणे हा आमच्यासाठी भावनेचा विषय नाही. तो सामाजिक, आर्थिक प्रगतीचा विषय आहे. आता हे राज्य कधी आणि केंव्हा केलं पाहिजे याबद्दल आमची मतं आहे. आम्ही तीन राज्य तयार केली, दोन राज्य विकसित झाली. काँग्रेसने एक राज्य तयार केलं, पण आंध्र आणि तेलंगणा हे भाऊ-भाऊ भांडत आहे. त्यामुळे राज्य वेगळे करू नका, राज्याची निर्मिती करा ही आमची भूमिका आहे. आज मला महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे मराठवाडा असो, विदर्भ असो जर हे विकासाच्या बाबतीत मागे राहिले तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

Follow @ibnlokmattv

First Published: Nov 1, 2014 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading