प्रचाराचं 'चक्रीवादळ', आजपर्यंत कोण काय बोललं वाचा एक पेजवर

प्रचाराचं 'चक्रीवादळ', आजपर्यंत कोण काय बोललं वाचा एक पेजवर

  • Share this:

neelabhtoons_maharashtra election12 ऑक्टोबर : आली समीप घटीका...येत्या 15 तारखेला मतदान आणि 19 ऑक्टोबरला जनतेचा फैसला...महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची धुरळा उडवली. विशेष म्हणजे सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे राज्यात एकच प्रचाराचे चक्रीवादळ सैरभैर सुटले. कुठे टीका, तर कुठे आरोप-प्रत्यारोप तर कुठे कोपरखळ्या आणि खिल्ली उडवली गेली. नरेंद्र मोदी विरुद्ध ठाकरे, पवार विरुद्ध मोदी, राहुल गांधी विरुद्ध मोदी एवढंच नाहीतर स्थानिक पातळीवर शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले. आज रविवार असून प्रचाराचा खर्‍या अर्थाने सेमिफायनल ठरणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात कोण कुणावर काय बोललं त्याचा हा आढावा...

आबांची जीभ घसरली

‘मनसेनं एक उमेदवार उभा केला आहे. आज मनसेचे लोक मला भेटले म्हटले आबा आमचा पाठिंबा तुम्हाला. म्हटलं का? तर म्हणे आमचा एक उमेदवार तुरुंगात आहे. मी म्हटलं काय पुण्य कर्म केलं. त्यांनी सांगितलं त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय. मिरजेत अर्ज भरला. जर त्याला इथं उभा राहयचंच होतं, आपल्या तालुक्याचं आमदार व्हायचं होतं तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा.’

'टाळी' रंगली

टाळी वाजणार की नाही वाजणार यावरुन आतापर्यंत बराचं काथ्याकूट झाला पण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे. युती ज्या दिवशी तुटली त्याच्या दुसर्‍या दिवशी उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती, मी सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण उद्धव यांनी प्रतिसाद दिला नाही असा खुलासा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. राज म्हणतात, 25 तारखेला युती तुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी बाजीराव दांगट यांच्यामार्फत उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा झाली. उद्धव यांनी भाजपने आपल्याला कसं फसवलं याबद्दल सांगितलं. एवढंच नाहीतर प्रचारात एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करायचं नाही असंही ठरलं होतं. त्यानंतर चर्चा करण्याचं ठरलं होतं. आमच्याकडून नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर तर सेनेकडून अनिल देसाई येणार होते. ऐन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. मी सगळे एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. पण शेवटपर्यंत ना उद्धव यांनी फोन केला ना देसाईंनी. अखेरीस संध्याकाळी फॉर्म उमेदवारांना देऊन टाकले. पण आमच्या चर्चा होऊ शकली नाही जर झाली असती तर काही होऊ शकलं असतं असा खुलासा राज यांनी केला.

संजय राऊतांकडून 'टाळी'चे संकेत

राज यांच्या गौप्यस्फोटानंतर लगेच शिवसेनेनंही आपली बाजू मांडली. राज ठाकरेंची भूमिका महाराष्ट्र हिताची आहे. त्यांची भूमिका आम्ही मानतो. निवडणुकांचे निकाल लागू द्या त्यानंतर सगळ्यांची भूमिका स्पष्ट होईल असं स्पष्ट संकेत सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले.

शर्मिला ठाकरेंची 'राज की बात'

निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे नक्कीच एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य खुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलंय. ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्र जिंकता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीच्या आधीच राज-उद्धव एकत्र यायला हवे होते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

'पुतण्याने दिली काकांना हाक'

एकीकडे काका अर्थात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती होऊ शकली असती असा खुलासा केला आता त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांनी सोबत येण्याचं एकाप्रकारे निमंत्रणच दिलंय. सेना-मनसे एकत्र येणार अशी मी तरी चर्चा ऐकली नाही. अशा अफवा खूप आहे. आम्ही एकटे लढत आहोत एकटं जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य मी ऐकेलं नाही. पण आम्ही स्वबळावर लढत आहोत. सत्तेवर आल्यावर जो कुणी महाराष्ट्र घडवायला सोबत येईल त्यांना आम्ही चांगली वागणूक देऊ आणि सोबत घेऊ असं आदित्य म्हणाले.

अजित पवारांच्या बॅगेत सापडली 4 लाखांची रोकड

निवडणुका आणि पैसाचं गणित नेहमी बिघडतं. ऐन निवडणुकीच्या काळात कोट्यवधी रुपये जप्त केले असून अजूनही हा सिलसिला सुरूच आहे. याचा तडाखा अजित पवारांना बसला. परभणीमध्ये गंगाखेड-परळी नाक्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीत 3 बॅगा सापडल्या होत्या. या बॅगा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे स्वीय सहायक यांच्या असून त्यात 4 लाख 85 हजार,पवारांचे कपडे व व्हिजिटिंग कार्ड सापडले होते. या प्रकरणी अजित पवारांवर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हा पवारांचा अपमान - संजय राऊत

राष्ट्रवादीचे पुढारी अजित पवारांच्या बॅगेत फक्त चार लाख रुपये सापडतात हा त्याचा अपमान आहे. त्यांचे नुसते खीसे जरी झटकले तरी 25 एक कोटी सहज पडतात आणि निवडणूक आयोगाला पवारांची बॅगेत फक्त चार लाख रुपये सापडले. यासारखा मोठा अपमान अजित पवारांचा गेल्या 25 वर्षात कधीचं झालेला नाही अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली.

सीमाप्रश्नावरून राजकारण

सीमारेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन केलं. पाक सैनिकांनी सीमालगतच्या भागातील गावावर गोळीबार केला या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला पण यावरूनही राजकारण सुरू झालंय. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. गेल्या 10 दिवसांत सीमेवर जितका गोळीबार झालाय तेवढा गेल्या 10 वर्षातही झालेला नाही अशी जळजळीत टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तर काँग्रेसचे नेते विनाकारण टीका करत आहे आता वेळ बोलण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आहे असं मोदी म्हणाले होते

सोनिया गांधींचा प्रचारात

भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. निवडणुकीत वेगळेवेगळे लढणारे हे दोन पक्ष निवडणूक झाली की सत्तेच्या मोहामुळे पुन्हा एकदा परत एकत्र येतील असं भाकित काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं. तसंच देशातल्या लोकांना खोटी खोटी स्वप्नं दाखवणार्‍या मोदी सरकारकडे आता देशातील जनता उत्तरं मागत आहे. गेल्या 100 दिवसांत काय काम केलंय ? सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. आमचे जवान शहीद होत आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर का नाही दिलं ? असा सवाल सोनियांनी विचारला.

मोदींनी घेतली गुन्हेगार पार्श्वभूमीच्या उमेदवाराची सभा

भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्याना भाजपात प्रवेश दिल्यान भाजपवर टीका होत आहे. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथे भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद मोदींनी सभा घेतली. शिवाजी कर्डिले यांच्यावर विरोधात 12 खटले सुरू असून बँक प्रकरणात 1 वर्ष सक्तमजुरी आणि 3 महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षाही झाली आहे.

मोदी विरुद्ध पवार

बारामतीत झालेल्या सभेत काका-पुतण्यांच्या राजकारणातून बारामतीला मुक्त करा, देश स्वतंत्र झाला पण बारामती अजूनही गुलामगिरीत आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. शरद पवार संरक्षण मंत्री असताना सीमेवर हिंसाचार होत नव्हता का ? असा सवाल त्यांनी केला आणि दहशतवादाचं राजकारण करू नका, अशी टीकाही त्यांनी केली. पवारांचं उत्तर मोदींनी बारामतीच्या पाण्याची चिंता कऱण्यापेक्षा गुजरातच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा मी गेली पन्नास वर्ष विकासाचं राजकारण केलं. आम्ही सगळ्या समाजघटकांना सोबत घेतलं असं पवारांनी ठणकावून सांगितलं.

ठाकरे विरुद्ध भाजप

सुषमा स्वराज दुखावल्या : युती तुटल्यावर आम्ही शिवसेनेवर टीका करायचे नाही असे ठरविले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी ते पथ्य पाळले नाही, त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना अफजल खानाची फौज म्हटले, राजकारणात विरोधक असतात शत्रू नसतात. बाळासाहेब असताना त्याना त्यांचे कुटुंब एकसंध ठेवता आले नाही, त्याच पद्धतीने राजकीय युत्या बनतात आणि तुटतात असं स्वराज म्हणावल्या.

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापला

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - मोदी

जोपर्यंत मी दिल्लीत सत्तेवर आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. निवडणुकीचा जोर चढू लागताच काही मंडळी वाटेल ते बोलू लागलेत. दिल्लीत सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. पण यावेळी स्वतंत्र विदर्भाविषयी भूमिका जाहीर करणं त्यांनी टाळले आहे.

विदर्भाची भूमिका ठाम -जावडेकर

वेगळा विदर्भ ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. शिवसेनेचा काय मुद्दा आहे हा त्यांचा विषय आहे असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व्यक्त केलं. आम्हीची प्रतिबंधता जनतेशी असून महाराष्ट्र राज्य काँग्रेस -राष्ट्रवादी मुक्त करायचंय हे आमचं लक्ष्य आहे असंही जावडेकर म्हणाले.

'अब की बार शरद पवार'

यावेळी राष्ट्रवादीचं 100 टक्के सरकार येणार आहे आणि शरद पवारांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी मी करणार आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 'अब की बार शरद पवार' असाच नाराच दिलाय.

नारायण राणे निरुद्योगमंत्री ? -उद्धव ठाकरे

कोकणात उपचारासाठी धड रुग्णालय नाही. कोणतेही मोठे प्रकल्प इथं आणले नाही. आपल्या स्वार्थापोटी प्रकल्प आणण्याचा हट्टहास राणेंनी केला असा आरोप उद्धव यांनी केला. ते एवढ्यावरच थांबले नाही, काही जण म्हणतात, मी इथला नेता आहे. मी इथला विकास करणार मग इतके वर्ष काय केलं. कसले उद्योग केले निरुद्योगमंत्री ? सगळ्या जमिनी यांनी हडपल्या. साधी पानटपरी ही यांनी सोडली नाही. या पानटपरीतही यांची पार्टनशिप असेल म्हणून चुना लावायला मोकळे असेल. कटिंग चहा जरी घेतला तरी त्यामध्ये सुद्धा अर्धा कट असेल अशा शेलक्या शब्दात उद्धव यांनी राणेंवर टीका केली.

हा पैसा कुणाचा?

मतदानाला अवघे काही उरले असताना राज्यात निवडणुकीच्या काळात पैशांचा महापूर थांबता थांबेना. इंदापूर, पंढरपूर,अमळनेर, बुलडाणा,नागपूर,दहिसर,पंढरपूर,धुळे,डोंबिवली,पुणे,डहाणू, औरंगाबाद,नंदूरबार, बीड आणि परभणीमध्ये कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आलीये. राज्यभरात आता पर्यंत तब्बल 15 कोटी 93 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. काही ठिकाणी सापडलेली रोकड ही बँकेची असल्याचं सांगितलं जात आहे पण काही ठिकाणी तर ही रोकड कुणाची, कुठून आली याचा थांगपत्ता लागत नाहीये.

कोटीच्या कोटी उड्डाणं

 - इंदापूर - 5 कोटी

 - पंढरपूर - 1 कोटी

 - अमळनेर 1 कोटी

 - बुलडाणा 80 लाख

 - नागपूर - 70 लाख

 - दहिसर - 50 लाख

 - पंढरपूर - 40 लाख

 - धुळे - 36 लाख

 - डोंबिवली - 35 लाख

 - पुणे 20 लाख 48 हजार

 - डहाणू 16 लाख 50 हजार

 - फुलंब्री, औरंगाबाद द 16 लाख

 - नंदूरबार - 11 लाख

 - सेलू, बीड - 7 लाख

 - माजलगाव, बीड ड 5 लाख

 - परभणी 4 लाख 85 हजार

 - तेलगाव नाका, बीड 2 लाख

Follow @ibnlokmattv

First published: October 12, 2014, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading