शिवसेनेविरोधात बोलणार नाही - मोदी

  • Share this:

narendra modi

05 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मला आदर असून त्यांच्या अनुपस्थितीत राज्यात ही पहिलीच निवडणूक होत आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून मी शिवसेनेवर टीका करणार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या तासगावमध्ये मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे.

सांगलीतील भाजप उमेदवार अजित घोरपडे, सुरेश खाडे, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मोदी बोलत होते. या सभेला सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मोदींना घोंगडी भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले. गुजरात आजही महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वच जण वापर करत आहेत, हे दुदैर्वी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणार्‍यांनी त्यांच्या जलसंवर्धनाचा आदर्श का ठेवला नाही, असा प्रश्न मोदींनी पवारांना विचारला. तुमच्या चरित्रात शिवरायांचे गुण येण्याची शक्यताच नाहीत पण मुख्यमंत्री ,कृषीमंत्री म्हणून शिवरायांनी लोकांसाठी पाण्याची ज्या योजना राबवल्या त्यातून प्रेरणा घेतली असती आणि पाण्याची व्यवस्था केली असती तर राज्यात शेतकर्‍यांवर मरण्याची वेळ आली नसती असा टोला त्यांनी पवारांना लगावला. मुंबई विमानतळ, व्हिक्टोरिया टर्मिनसला शिवाजी महाराजांचे नाव भाजप सरकारच्या काळात देण्यात आले अशी आठवणही त्यांनी करुन दिली. छत्रपती शिवरायांच्या गोष्टी करणार्‍या पवारांच्या बारामतीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यापेक्षा मोठा पुतळा मी सुरतमध्ये बसवला आहे असं मोदींनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पूर्ण बहुमत असणारे सरकार बनवा, मी जबाबदारी घेण्यास तयार आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार कधीच बनवू नका असं आवाहनही मोदींनी केले. भाजपला बहुमत दिल्यास आम्ही काँग्रेसप्रमाणे पळ काढणार नाही. पाच वर्षांनतर तुम्ही आम्हाला जाब विचारु शकता असं मोदींनी सांगितले. मी एक कामदार बनून देशाची सेवा करत आहे. सांगलीतील जनतेने लोकसभा निवडणुकीत मी मागितले त्यापेक्षा जास्त दिलं आहे. संजयकाका पाटील यांना निवडून दिल्याने मी मतदारांचे आभार मानतो. माझ्याकडून साठ दिवसांचा हिशोब मागता पण काँग्रेसनं साठ वर्षांचा हिशोब दिला नाही असं मोदींनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2014 02:11 PM IST

ताज्या बातम्या