03 सप्टेंबर : देशात परिवर्तन होऊन फक्त सहा महिने झाले आहेत. त्यांना अजून वेळ द्यायला हवा, असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात परिवर्तन घडल्याने नवचैतन्य निर्माण झाल्याचं म्हटलं. देशात आत्मगौरव आणि जगात भारत गौरव वाढतोय, असंही ते म्हणाले आहेत. विजयादशमीनिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन कार्यक्रम नागपुरात पार पडला. विधिवत शस्त्रपूजन करून पथसंचलन करण्यात आलं. त्यावेळी सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं.
भाषणाच्या सुरुवातीला मोहन भागवत यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी 'मंगळयान' मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. तसेच आशियाई स्पर्धेत सोने लुटणार्या अर्थात गोल्ड मेडल पटकावणार्या खेळाडूंचंही कौतुक केले. यावेळी भागवत यांनी मोदी सरकारचं तोंडभरून स्तुती केली. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वागत करत प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवर मेहनत घेऊन या अभियानाला हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी केलं. सहिष्णुता हाच भारताचा धर्म आहे, असं सांगत आपल्याला स्वप्नातला सामर्थ्यवान भारत घडवायचा आहे, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
यावेळी कट्टरतावादावरही त्यांनी टीका केली. सध्या इराकमध्ये हिंसाचार घडवत असलेल्या आयसीसवरही त्यांनी हल्ला चढवला. मोदींच्या अमेरिका दौर्याचं त्यांनी कौतुक करत देशात आत्मगौरव आणि जगात भारत गौरव वाढतोय, असं ते म्हणालेत.
Follow @ibnlokmattv |