राष्ट्रवादीलाही हवा 'छत्रपतींचा आशीर्वाद', जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

राष्ट्रवादीलाही हवा 'छत्रपतींचा आशीर्वाद', जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

  • Share this:

ncp mani02 ऑक्टोबर : शेतमजुरांना पेन्शन, मागेल त्याला कृषी पंप जोडणी, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी निधी, राज्यात एक हजार किमीचा एक्स्प्रेस, प्रत्येक जिल्ह्यात विमानांसाठी धावपट्‌ट्या, औरंगाबादेत मोनो रेल अशा घोषणांचा पाऊस पाडत राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. एवढेच नाहीतर या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने 'छत्रपतींचा आशीर्वाद'ही मागितला आहे. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारकाचं काम सुरू करणार असं आश्वासन राष्ट्रवादीने दिलंय.

काँग्रेससोबत गेल्या 15 वर्षांची आघाडी तोडल्यानंतर राष्ट्रवादी स्वबळावर मैदानात उतरली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ठोस दिशा ठाम निर्धार म्हणत राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आलाय. 65 वर्षं पूर्ण झालेल्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकर्‍याला पेन्शन देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवणार असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलंय. शेतकरी, शेतमजूर, तरुण, नोकरदार अशा सर्वांसाठीच या जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं देण्यात आलीये. तसंच राष्ट्रवादीने अरबी समुद्रात प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू करणार असं आश्वासन दिलं. केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उशीर झाला. आता नव्या आराखड्याला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू होईल असं तटकरेंनी स्पष्ट केलं. तसंच मुंबई मोनो रेलच्या धर्तीवर औरंगाबाद,नाशिक आणि नागपूरमध्ये मोनो रेल उभारणार असं आश्वासन दिलंय. त्याचबरोबर सर्वच जिल्ह्यांमध्ये विमानांसाठी धावपट्‌ट्या विकसित करणार असं आश्वासनही देण्यात आलंय. तर शिवसेनेनं व्हिजन डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक विद्यार्थांना टॅब देणार अशी घोषणा केली. सेनेनं मुंबईत अगोदरच डिजिटल क्लासरुम मोहिम फत्ते केलीय. राष्ट्रवादीनेही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत 'डिजिटल स्मार्ट क्लासरूम' स्थापन करणार असल्याचं आश्वासन दिलंय.

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनं

- 65 वर्षं पूर्ण झालेल्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन

- 60 टक्के शेती ठिबक आणि तुषार सिंचनाखाली आणणार

- मागेल त्याला कृषी पंप जोडणी

- प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा

- स्वतंत्र ओबीसी मंत्रालय

- मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद

-औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर येथे मोनो रेल उभारणार

- महाराष्ट्रात 1000 किमीचा एक्स्प्रेस विकसित करणार

- सर्व जिल्ह्यांमध्ये विमानांसाठी धावपट्‌ट्या विकसित करणार

- राज्यातल्या सर्व कॉलेजेसमध्ये मोफत वायफाय

- येत्या 5 वर्षात राज्य बालकामगारमुक्त करणार

- अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक

- पोलिसांना मुंबईत हक्काचे घर देण्यासाठी 10 एकर जागा देणार

- एस टी स्टँडवर 20 रुपयांत स्वच्छ आणि सकस आहार उपलब्ध करुन देणार

- मुंबईत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांची स्मारकं उभारणार

- महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत 'डिजिटल स्मार्ट क्लासरूम' स्थापन करणार

- अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून राज्यातील वीज निर्मिती क्षमता दुप्पट करणार

-ज्या भागातील मानवविकास निर्देशांक उंचावण्याची गरज आहे, त्या भागांसाठीची तरतूद 500 कोटींहून 2,000 कोटी रुपयांवर नेण्यात येईल 5,000 लोकसंख्येपेक्षा अधिक वस्तीच्या गावांमध्ये सांडपाणी आणि कचर्‍याचा निचरा करण्याची यंत्रणा उभारण्यात येईल

- राज्यातील सर्व 28 हजार ग्रामपंचायतींमधील प्रमुख अंतर्गत रस्ते आणि गटारे सिमेंट काँक्रिटची करणार

- 'जीवनदायी आरोग्य योजने'ची मर्यादा दुपटीने वाढवून तीन लाखांवर नेली जाईल.

Follow @ibnlokmattv

First published: October 2, 2014, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading