राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

  • Share this:

president's rule in maharashtra

28 सप्टेंबर :  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीवर रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने विधानसभेची मुदत संपण्यास जेमतेम एक महिन्याचा कालावधी असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीला महिनाभरापेक्षाही कमी कालावधी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतात आले होते. यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. राज्यपाल राव यांनीही शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आणि केंद्र मंत्रिमंडळाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळानेही शनिवारी रात्री तातडीची बैठक बोलवून ही शिफारस मंजूर करुन प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी सकाळी या प्रस्तावावर स्वाक्षरी करत हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर शिक्कामोर्तब झाले.  राज्यात सरकार अल्पमतात आल्याने विधानसभेची मुदत संपण्यास अवघा महिनाभराचा कालावधी उरला असताना राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 28, 2014, 2:55 PM IST

ताज्या बातम्या