25 सप्टेंबर : आघाडीच्या जागावाटपाचा घोळ मिटलेला नसतानाच काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने नेहमीप्रमाणे रात्री उशिरा 118 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काल जाहीर करण्यात आलेल्या यादीत नारायण राणे यांना कुडाळ आणि पतंगराव कदम यांना पलूस-कडेगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. विशेषमध्ये दक्षिण कराडमधून सलग सातवेळा विधानसभेवर निवडून आलेल्या विलासकाका उंडाळकर पाटलांचा पत्ता कापत त्यांच्या जागी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्याशिवाय या यादीत 9 महिलांचा समावेश आहे तर चार विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.
यामध्ये राष्ट्रवादीने अदलाबदलीसाठी दावा केलेल्या नवापूर आणि मालेगावच्या जागांचा समावेश आहे. नवापूरचे समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार शरद गावित आणि मालेगावचे जनसुराज्यशक्तीचे विद्यमान आमदार मुफ्ती महंमद इस्माईल यांचा राष्ट्रवादीने अलिकडेच प्रवेश करून घेतला होता. पण काँग्रेसनं नवापूरमधून माजी मंत्री सुरूपसिंग नाईक तर मालेगाव मध्यमधून शेख आसीफ शेख रशीद यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसतं आहेत. या यादीत बहुतेक विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. तसेच ज्या सहयोगी अपक्षांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. वयोमानामुळे शिरोळमधून सा.रे. पाटील आणि कुलाबामधून ऍनी शेखर यांची उमेदवारी नाकारली जाईल अशी चर्चा असताना देखील या दोघांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बुलडाणामधून हर्षवर्धन सपकाळ अकोटमधून महेश गणगणे, औरंगाबाद पश्चिममधून जितेंद्र देहाडे आणि अहमदनगर शहरमधून सत्यजीत तांबे या तरुण उमेदवारांना संधी देण्यात आलीय. तसेच जिंकून येण्याची खात्री असलेल्या काही विद्यमान आमदारांचे मतदारसंघ बदलण्यात आलेत.