पुढच्या वर्षी लवकर या !

पुढच्या वर्षी लवकर या !

  • Share this:

raja 3

09 सप्टेंबर : चैन पडेना आम्हाला..बाप्पा निघाले गावाला...खरंच दहा दिवसांचा मुक्काम आटपून आपले लाडके बाप्पा आपल्या गावाला परत निघाले. बाप्पांना निरोप देतांना 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' असं साकडं घालून आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांनी जडपावलांनी निरोप दिला. गेली दहा दिवस भक्तीमय वातावरणानं राज्य न्हावून निघालं. आज सकाळपासून राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यासाठी सुरुवात झाली तीही जड अंत:करणानं.. मुंबई,पुणे,नाशिक,औरंगाबाद,रत्नागिरीसह संपूर्ण राज्यात मोठ्या जल्लोषात बाप्पाची मिरवणूक निघाली.

मुंबईत लालबागचा राजा, गिरणगावचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि इतर मोठ्या गणपतींची मिरवणूक मोठ्या दिमाखात निघाली. ढोल ताशांचा गजर, डिजेचा दणदणाट, गुलालाची उधळणं आणि बाप्पाचा जयघोष…अशा उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक पुढे पुढे सरकत निघाली. मुंबईतील गिरगाव, जुहू , दादर चौपाटी आणि पवई तलाव परिसर गणेशभक्तांनी फुलून गेला. घरगुती गणपती, छोटीमोठी गणेशमंडळ गणेशाची आरती करुन बाप्पाचा अखेरचा निरोप घेतला जात होता. तर राजावर पुष्पवृष्टी, राजाचं मनमोहक रुप डोळ्यात साठवून घेतलं जातं होतं.

गणेशगल्लीचा गणपती गिरगाव चौपाटीवर पोहचला. प्रगती क्रीडामंडळ, तेजुकाया मॅन्शनचा देखणा गणपती आता भायखला स्टेशनपर्यंत पोहोचले आहेत. आता मुंबईत परळमधल्या कामगार वस्तीतला गणपती म्हणजे नरेपार्कचा गणपती हा गणपतीही विर्सजन स्थळाच्या दिशेने निघाला आहे.

दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपतींसोबतच मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनाचा उत्साह पहायला मिळतोय. तेजुकाया, रंगारी बदक चाळीचा गणपती, खेतवाडीतले गणपती, गिरगावचा राजा, गिरगावचा महाराजा, मुंबईचा राजा तसंच लालबागचा राजा असे मुंबईतले गणपती गिरगावला विसर्जनासाठी येणार आहेत.

पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि याच पुण्यात लोकमान्य गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सुरूवात केली. आज पुण्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात जड:अंतकरणाने मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालंय. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीनी पुणेकरांचा निरोप घेतलाय. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालंय.

पुणेरी ढोल…लेझीम पथक..सळसळत्या तरुणाईचा उत्साह…आणि अखंड पुणेकरांची श्रद्धा..अशा भक्तीमय वातावरणात पुणेरी मानाचे गणपती. देखण्या पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणुका हे पुण्याच्या मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य. सकाळी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना टिळक पुतळ्यापासून सुरूवात झाली.

खास पुणे ढोल ताशाच्या गजरात मानाचे गणपती निघाले. पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालखीतून मिरवणूक निघाली. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला मिरवणुकीत टिळकांनी अग्रस्थान दिलं. तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची पालखीतून मिरवणूक काढली गेली. या मंडळाचं यंदाचं 122 वं वर्ष होतं. मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम. हे मंडळ पुण्यातलं सगळ्यात जुनं मंडळ समजलं जातं. अतिशय देखण्या अशा या मूर्तीची फुलांच्या रथांतून मिरवणूक काढण्यात आली.

तर मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. विविध फुलांनी सजविलेल्या मयूर रथात हा गणपती विराजमान झाला होता. ढोल-ताशांची पथकं आणि मल्लखांबांची प्रात्यक्षिकं ही या मिरवणुकीची वैशिष्ट्य ठरली. आणि शेवटचा मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या गणपती. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन दुपारी दोनच्या सुमाराला झालं, त्यानंतर तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीचं आणि गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचंही विसर्जन झालं.

Follow @ibnlokmattv

First published: September 8, 2014, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading