शरीफ यांना पायउतार होण्याचा लष्करप्रमुखांचा फर्मान ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2014 01:19 AM IST

शरीफ यांना पायउतार होण्याचा लष्करप्रमुखांचा फर्मान ?

pak01 सप्टेंबर : पाकिस्तान राजकीय संकटाच्या गर्तेत सापडला आहे. पाकमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. सध्याची परिस्थिती बघता पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पायउतार व्हावं, असा सल्ला लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी दिल्याचं कळतंय. पाकिस्तान सरकार आणि लष्कराने मात्र या वृत्ताचं खंडन केलंय. शरीफ सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार सरन्यायाधीशांनी सर्व न्यायाधीशांच्या सुट्‌ट्या रद्द केल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शरीफ यांनी उद्या मंगळवारी संसदेचं विशेष सत्र बोलावले आहे. या सत्रात ताहीर-उल-कादरी यांच्या पाकिस्तानी अवामी लीग यांच्यावर बंदीचा ठराव आणण्याची शक्यता आहे तसंच लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

पाकिस्तानमध्ये तिसर्‍या दिवशी सरकार विरुद्ध आंदोलक असं शीतयुद्ध सुरूच होतं. इम्रान खान आणि ताहीर-उल-कादरी यांच्यावर दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरीफ यांनी राजीनामा द्यावा, यासाठी इम्रान खान यांच्या तहरिक-ए-इस्लामिक आणि ताहीर-उल-कादरी यांच्या पाकिस्तानी अवामी लीग यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात आंदोलन छेडलंय. या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. निदर्शक सोमवारी सकाळी पाकिस्तानच्या सचिवालयावर चाल करून गेले. आंदोलकांनी पाकिस्तानचं सरकारी चॅनेल पीटीव्हीचाही काही काळ ताबा घेतल्यानंतर प्रक्षेपण बंद पडलं होतं. त्यानंतर सैन्याला बोलावण्यात आलं. त्यांनी आंदोलकांना चॅनेलच्या इमारतीमधून बाहेर काढलं, त्यानंतर प्रक्षेपण पुन्हा सुरू झालं. सरकारी चॅनेलच ताब्यात घेण्याच्या विरोधकांच्या या कृतीचा पाकिस्तानात निषेध केला जातोय. संध्याकाळी पुन्हा एकदा निदर्शकांनी सचिवालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पुन्हा एकदा पोलीस आणि निदर्शक समोरा-समोर उभे ठाकले. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रूधूर सोडला. यात सहा जण जखमी झाले. यापूर्वी झालेल्या हिंसक आंदोलनात तिघांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते. या प्रकरणी इम्रान खान आणि कादरी यांच्यावर दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2014 10:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...