नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही : शिवसेना

  • Share this:

uddhav thackray

26 ऑगस्ट :  बिहार आणि अन्य राज्यांमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाची चव चाखावी लागली असतानाच शिवसेनेनंही या पराभवरून भाजपला चिमटा काढला आहे. नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची 'हवा' आणि 'गणिते' वेगळी असतात हा धडा या पोटनिवडणुकीतून मिळाला आहे. पोटनिवडणुकांच्या जागांची संख्या कमी असली तरी त्या निकालांनीही एक धडा दिलाच आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लालूप्रसाद यादव, नितीश कुमार आणि काँग्रेस यांच्या महायुतीला 10 पैकी 6 जागा जिंकता आल्या तर भाजपला फक्त चारच जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकमध्येही 3 पैकी 2 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत तर मध्य प्रदेशात भाजपने 2 आणि काँग्रेसने 1 आणि पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे देशभरातून मोदी लाट ओसरली की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

'लोकसभेत मोदी लाट होती व या लाटेने उत्तर भारतातील मोदीविरोधकांना भुईसपाट केले पण पोटनिवडणुकीतील निकालाने या विरोधकांना जीवदान मिळाले असे उद्धव ठाकरे म्हणतात. मोदी लाटेत गटांगळ्या खाणारे बिहारमधील कट्टर विरोधक लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार एकत्र आले. या दोघांना मिळालेल्या विजयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे मतही ठाकरे यांनी मांडले. या पोटनिवडणुकांमधून लोकसभा व विधानसभेचे मतदान वेगळे असते हे मतदारांनी दाखवून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही. लोकांनी मोदींना राष्ट्राचा कारभार चोख करण्यासाठी मतदान केले. राज्याची हवा आणि गणिते वेगळी असतात, ती बिघडू नयेत यासाठी बिहार, कर्नाटकातील निकालांचा अभ्यास करावाच लागेल असे सांगत उद्धव ठाकरेंनी स्वबळाची भाषा करणार्‍या भाजपला महायुतीचे महत्त्व दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2014 01:25 PM IST

ताज्या बातम्या