25 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर झालेल्या शाईहल्ला प्रकरणावरून आता राजकारण सुरू झालंय. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केलीय. संगमनेरचा तालुका सेनेचा उपाध्यक्ष भाऊसाहेब हासे यांने महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर शाई फेकली होती, त्याच्या विरोधात पोलिसांनी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केलाय.
मागील शनिवारी थोरात यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला तेव्हा हासेकडे धारदार शस्त्र असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याच्याकडून गुप्ती जप्त करण्यात आलीय. मात्र पोलिसांचा आरोप खोटा आहे आणि पोलीस महसूल मंत्र्यांच्या दबावाखाली काम करतायत, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. हा सहानुभूती मिळवण्याचा थोरात यांचा बनाव असल्याचं खेवरे यांनी म्हटलंय. तर हासेच्या मागच्या सूत्रधारांपर्यंत पोलिसांनी पोहोचावं अशी मागणी काँग्रेसने केलीय.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शनिवारी संगमनेरमध्ये शाईहल्ला झाला. पण हा हल्ला जीवघेणा होता हे आता समोर आलंय. त्यातच या प्रकरणाला आता वेगळा रंग चढतोय. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यावरून वाद निर्माण झालाय. बाळासाहेब थोरात यांच्यावर हा हल्ला भाऊसाहेब हासे या शिवसैनिकानं केला, असं पोलिसांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे भाऊसाहेब हासेकडून हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हासेने या अगोदर माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना प्रचारादरम्यान मारहाण केली होती. तर वीज अधिकारी साळींना मारहाण आणि कार्यालयाची तोडफोड केली होती .तर अलीकडेच 14 ऑगस्टला थोरातांच्याच कार्यक्रमात निदर्शनं केली होती.
Follow @ibnlokmattv |