गोविंदांकडून सुप्रीम कार्टाचे नियम धाब्यावर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2014 02:25 PM IST

गोविंदांकडून सुप्रीम कार्टाचे नियम धाब्यावर

dahi handi police

19 ऑगस्ट :  सुप्रीम कोर्ट आणि बालहक्क संरक्षण आयोगाचे आदेश धुडकावून सोमवारी मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवात गोविंदांनी नेहमीचाच धुडगूस घातला. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत, आवाजाची मर्यादा धुडकावून लावत, हंडीच्या उंचीचे नवे थर गाठत कालचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल शेकडो गोविंदांवर कारवाई झाली तर कुठे येणार्‍या जाणार्‍यांची छेड काढण्याचा प्रकारही पाहायला मिळाला.

नियम हायकोर्टाचे असोत किंवा सुप्रीम कोर्टाचे दहीहंडी आयोजकांनी आपल्या सोयीने ते पाळण्याची वृत्ती काल दाखवून दिली. 12 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीच्या थरात सहभागी करायला सुप्रीम कोर्टाने मनाई केली होती. पण कालच्या दहीहंडीमध्ये याचं सर्रास उल्लंघन झालं. किती सार्वजनिक दहीहंडी मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यावर पोलिसांनी कोणती कारवाई केली यासंदर्भात आज बालहक्क संरक्षण आयोग अहवाल सादर करणार आहे.

सेलिब्रिटीजचा झगमगाट, कर्कश्य डीजे आणि आठ ते दहा थरांच्या उंचीवर लटकणार्‍या हंडीभोवतीच्या लाखोंच्या बक्षिसांमुळे गोविंदा पथकांच्या उत्साहाला भलतंच उधाण आलं होतं. सुप्रीम कोर्टाने आवाजाच्याही मर्यादा घालून दिल्या होत्या. या नियमांनाही काल पायदळी तुडवण्यात आलं. सुमायरा अब्दुलअली यांच्या आवाज फाऊंडेशननं नोंदवलेल्या आकडेवारीत हे स्पष्ट झालं आहे. मुंबईत आवाजाची पातळी सरासरी 80 ते 90 डेसिबलदरम्यान होती. आवाज फाऊंडेशननं मुंबईतल्या जांबोरी मैदान, शिवसेना भवन आणि घाटकोपरमधल्या राम कदम यांच्या हंडीच्या ठिकाणी आवाजाची पातळी नोंदवली. यात सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत आवाज 94.1 डेसिबल इतका होता तर शिवसेना भवन इथं तर 106.8 डेसिबल इतका आवाज होता. घाटकोपरमधल्या राम कदम यांच्या हंडीत हा आवाज 92.6 डेसिबलपर्यंत पोहोचला होता. लोकप्रतिनिधींचीच मंडळं उल्लंघन करत असतील तर जनतेने कोणाकडे जायचं, असा सवाल आता विचारला जात आहे.

2,558 गोविंदांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

Loading...

गोविंदा पथकं आणि दहीहंडी आयोजकांच्या धिंगाण्याचा फटका मुंबईतील वाहतुकीलाही बसला. भर वर्दळीच्या रस्त्यांवरच लटकलेल्या हंड्या आणि ती फोडण्यासाठी, पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

इतकंच नाही तर वाहतूक नियमही धाब्यावर बसवत काल अडीच हजारांहून जास्त गुन्हे नोंदवण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संध्याकाळी सहापर्यंत तब्बल 2,558 गोविंदांवर कारवाई करण्यात आली. दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल 84 जणांवर तर हेल्मेट न घालता गाडी चालवल्याबद्दल 2,044 गोविंदांवर कारवाई करण्यात आली. एकाच मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल 352 जणांवर कारवाई झाली. ट्रकच्या केबिनवर बसून जाणार्‍या 78 जणांवर कारवाई करण्यात आली तर नाकाबंदीत 50 जणांवर कारवाई करण्यात आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...