दहीहंडी उत्सवात दोन गोविंदाचा मृत्यू

दहीहंडी उत्सवात दोन गोविंदाचा मृत्यू

  • Share this:

mumbai dahi handi 2014 news video

18 ऑगस्ट : कोर्टाशी दोन हात करून अखेर गोविंदांनी आपला हट्ट पूर्ण केलाय. पण या दहीहंडी उत्सवात दोन गोविंदांना आपला जीव गमवावा लागलाय तर शेकडो गोविंदा जखमी झाले आहे. ठाण्यामध्ये साईसदन राजेंद्र आंबेकर (46) या गोविंदांचा ह्रदयविकाराच्या झटका आल्यामुळे मृत्यू झालाय. तर रत्नागिरीमध्ये बबन उमासरे (55) या गोविंदाचा मृत्यू झालाय. रत्नागिरीत दापोली इथं दहिहंडी फोडताना बबन उमासरे पाचव्या थरावरून पडून जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मुंबईत आतापर्यंत 99 गोविंदा जखमी झाले आहेत. 16 गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. उर्वरीत गोविंदांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आलंय.

साईराम गोविंदा पथकावर गुन्हा दाखल

मात्र कोर्टाने घालून दिलेले निर्बंध सर्वत्र पायदळी तुटवण्यात आल्याचं दिसून आलंय. 12 वर्षाखालील मुलांचा सहभाग केल्या प्रकरणी ओम साईराम गोविंदा पथकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये पथकाच्या अध्यक्षविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोर्टाने 12 वर्षाखालील मुलाचा सहभाग नसावा अशी बंदी घातली असतानाही सहभाग केल्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याच्या ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हंडी फुटली रे...गोपाळा

ठाण्यामध्ये लाखमोलाची दहीहंडी अखेर फुटलीये. राष्ट्रवादीचे नेते आणि संघर्ष दहीहंडीचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने 3 हंड्या लावल्या होत्या. इथे 10 थर लावून रेकॉर्ड होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण अखेरीस हंड्या खाली उतरवून त्या फोडण्यात आल्या. स्पेनच्या कॅसलर्सनी 4 थर लावत एक हंडी फोडली. तर जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने 9 थरांची सलामी दिल्यावर त्यांना हंडी फोडण्याचा मान देण्यात आला. ही हंडी खाली घेऊन मग जय जवान मंडळाने 4 थर लावून फोडली. तर तिसरी हंडी विटावा मंडळाने 4 थर लावत फोडली आहे. जोगेश्वरीच्याच जयजवान मंडळाने 8 थर लावत जाणता प्रतिष्ठानची हंडी फोडली. तर ठाण्यातील टेंभीनाक्याच्या दहीहंडीतल्या तीनही हंड्या फुटलेल्या आहेत. यामध्ये ठाण्याच्या गौरीशंकर मंडळाने 8 थर लावून एक हंडी फोडली. महिलांसाठीची हंडी संकल्प मंडळाने 6 थर लावत फोडली तर तिसरी हंडी बालमित्र मंडळाने 8 थर लावून फोडली.

सरनाईकांची हंडी लागलीही आणि फुटलीही !

दोन गोविंदाचा मृत्यू झाल्यामुळे शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दहीहंडी होणार नाही अशी घोषणा करुन टाकली. पण सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यामुळे सरनाईकांनी प्रसिद्धी न करता गुपचूप दहीहंडी लावली. सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची हंडी फोडण्याचा मान माझगावच्या ताडवाडी गोविंदा पथकाला मिळाला.त्यांनी 8 थर लावत ही हंडी फोडली. उत्सवाआधी ही हंडी चर्चेत होती. हायकोर्टाच्या ताशेर्‍यांनंतर सरनाईकांनी ही दहीहंडी रद्द केली होती पण त्यानंतर त्यांनी या हंडीचं आयोजन केलं.

बक्षिसाचे पैसे माळीण दुर्घटनाग्रस्तांना मदत

पिंपरी चिंचवड परीसरातील मानाच्या अखिल वाकड सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला जल्लोषात झाला. गोविंदाचे कोणत्याही प्रकारचे थर

लावण्याऐवजी फक्त नागरीकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन बक्षिसाचे पैसे माळीण दुर्घटनाग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा संकल्प आयोजक कलाटे यांनी केला आहे.

सेलिब्रिटींचा तडका

मुंबई-ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवात नेहमीप्रमाणे बॉलिवूड,मराठी स्टार्सनीही हजेरी लावत रंगत आणली. वरळीतल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत धकधक गर्ल माधुरी, अजय देवगण, दिग्दर्शक रोहित शेटी, वरुन धवन आदी कलाकारांनी उपस्थिती लावली. तर आगामी मर्दानी सिनेमाचं प्रमोशन करत राणी मुखर्जीनं संकल्प प्रतिष्ठानमध्ये दहीहंडीही फोडली. घाटकोपरमध्ये राम कदम प्रायोजित दहीहंडीमध्ये अभिनेते जिंतेंद्र, अनिल कपूर, गोविंदा, दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि अभिनेत्री बिपाशा बसू यांनी हजेरी लावली आणि गोविंदांचा उत्साह वाढवला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2014 11:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading