धनगर आंदोलनाला हिंसक वळण, बारामतीत तोडफोड आणि जाळपोळ

धनगर आंदोलनाला हिंसक वळण, बारामतीत तोडफोड आणि जाळपोळ

  • Share this:

dhangar_andolan14 ऑगस्ट : वेगळ्या आरक्षणाऐवजी घटनेच्या तिसर्‍या सूचित समावेश करण्याच्या निर्णयाचा विरोध धनगर समाज आज (गुरुवारी) रस्त्यावर उतरला. पण या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागलं.

बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरातील राम गल्ली, खाटिक गल्ली, तालीम गल्ली या भागांमध्ये दुकानांसह वाहनांवर दगडफेक केली. तसंच एक्सीस बँकेचं एटीएमही फोडलं. आंदोलकांनी आठवडा बाजारात फिरून बाजारही बंद पाडला.

तर इंदापूर चौकात काही भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

बारामतीकडे येणार्‍या सर्व रस्त्यांवर धगनर आंदोलकांनी चक्काजाम केलाय. त्यामुळे अघोषित बंद परिस्थिती निर्माण झालीय. वातावरण तणावपूर्ण आहे. राज्यभरातही ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहे. तर पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौकात आंदोलन करण्यात आलं. मुंबईत कुर्ला रेल्वे स्टेशनवर आंदोलन करत धनगर कार्यकर्त्यांनी रेल रोको केलं.

सध्याच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही -मुख्यमंत्री

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आरक्षणाबाबात चर्चा केली, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर आरक्षणाबाबत तोडगा काढणं हीच सरकारची भूमिका राहील, असं स्पष्टीकरणही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. कृषी खात्यातर्फे आयोजित कृषीभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते.

अजित पवारांच्या घराबाहेर घोषणाबाजी

बारामतीमध्ये अजित पवारांच्या घराबाहेरही धनगर समाजाच्या लोकांनी आंदोलन केलं. अजित पवारांच्या सहयोग सोसायटीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शहरातल्या दुकानांवर दगडफेक करणार्‍या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.

मुंबईत रेल रोको, पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्या

मुंबईमध्येही धनगर आंदोलन अधिक पेटलं. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनवर रेल रोको केलं. त्यांनी ठाणे आणि सीएसटी दोन्हीकडे जाणारी रेल्वे वाहतूक रोखली होती. कुर्ला रेल्वे रोको प्रकरणी 30 धनगर कार्यकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  तसंच मुंबईजवळ नालासोपाराजवळही धनगर समाजानं आंदोलन केलं. आंदोलकांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या बसच्या काचाही फोडल्या. आक्रमक झालेल्या या 300 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सातार्‍यात राष्ट्रवादी आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

धनगर समाजाच्या आंदोलनाला सातार्‍यात हिंसक वळण लागलं. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अंगावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी बुक्का टाकला. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकानं बंद करायला लावली.

पुण्यात जानकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाचं आंदोलन झालं. चांदणी हे आंदोलन झालं.

यामुळे काही काळ इथली वाहतूक विस्कळीत झाली होती.

नागपूर-हैद्राबाद हायवे बंद पाडला

नागपुरातही धनगरांचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. धनगर समाज संघर्ष समितीने डोंगरगावमध्ये नागपूर-हैद्राबाद हायवे अडवला. या आंदोलनामुळे तीन ते चार किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. तिसर्‍या सूचित समावेश म्हणजे आपली शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसंच येणार्‍या निवडणुकीत राज्य सरकारला धडा शिकवू, असा इशाराही दिला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली.

अकोल्यात डफ, तुणतुणं वाजवत रास्ता रोको

धनगर समाजानं अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर डफ, तुणतुणं वाजवत रास्ता रोको केला. यावेळी 'जय मल्हार' अशी घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनामुळे तब्बल तासभर महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली तिसरी सूची आम्हाला चालणार नाही, धनगर समाजाला ताबडतोब आरक्षण जाहीर करा असं या आंदोलकांचं म्हणणंय. हे सर्व राजकारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं आहे. इतर मंत्री हे शरद पवारांच्या इशार्‍यावरून काम करत असल्याचा आरोप यावेळी धनगर समाज कृती समितीने केला.

सोलापुरात रास्ता रोको

सोलापूर शहर जिल्ह्यात आज धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिक-ठिकाणी रास्तारोको करीत चक्काजाम आंदोलन केलं. मुंबई-पुणे-सोलापूरमार्गे हैद्राबादकडे जाणारी वाहतूक तीन तास रोखून धरण्यात आली. त्यामुळे दक्षिण भारतात जाणारी वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. शेकडो वाहनं जागच्या जागी अडकून पडली होती. सोलापूर जिल्ह्यात बाळे,मोहोळ आणि टेंभूणच्त झालेल्या आंदोलनामुळे मुंबई-पुणे-हैद्राबाद चौपदरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. याशिवाय जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये राज्य मार्ग रोखण्यात आल्यानं आज दुपारपर्यंत वाहतूक कोलमडली होती.

कोल्हापुरात चक्का जाम

कोल्हापूर जिल्ह्यात धनगर समाजानंही आज चक्का जाम आंदोलन केलं. पुणे बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 सुमारे 2 तास अडवून धरण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूकही ठप्प झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तसंच आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय.

औरंगाबादेत रास्ता रोको

औरंगाबादमध्येही धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. चिखलठाणा परिसरात धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना लगेच ताब्यात घेतलं. आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 21 तारखेला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा लहू शेवाळे यांनी दिला.

Follow @ibnlokmattv

First published: August 14, 2014, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading