मुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2014 10:03 AM IST

मुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

mumbai_rain_201429 जुलै : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या पावसाने आता जोरदार बरसण्याचा इरादा केलाय. येत्या 24 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 14 सेंटीमीटरपर्यंत पाऊस नोंदवला जाऊ शकतो असं हवामान खात्यानं म्हटलंय. मागच्या 24 तासात सांताक्रुझमध्ये 48.3 मिलीमिटर तर कुलाब्यात 26.6 मिलीमिटर पावसाची नोंद झालीय. आतापर्यंत झालेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करण्यार्‍या धरणांमधला साठा वाढला आहे. तुलसी धरणासह इतर 6 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत.

डहाणूमध्ये दोन जण पाण्यात वाहून गेले

दरम्यान, आज मुंबई आणि परिसरात सकाळपासून संततधार सुरू आहे. डहाणूत धामणी धरण 71 टक्के भरलंय. या धरणातून वसई, विरार आणि मीरा-भाईंदरला पाणी पुरवठा केला जातो. तर डहाणू तालुक्यातल्या उर्से गावचा संपर्क तुटलाय. सूर्या नदीने धोक्याची पातळी

ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मात्र 2 जणं नदी पार करताना वाहून गेले. तसंच, या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठाही खंडीत झालाय. तर डहाणूजवळचे कासा हे गांव पूर्ण पाण्याखाली गेले आहे. तसंच आजूबाजूंच्या गावात ही रस्त्यावर पाणी तुंबलंय.

वसई विरारमध्ये पाऊसफुल्ल

Loading...

वसई तालुक्यात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वसई विरार, नालासोपारा परिसरात सखल भागात पाणी साचलंय. वसईमध्ये तानसा आणि वैतरणा नदी काठच्या गावात पाणी घुसलंय. भाताणे पूल पाण्याखाली गेलाय. तर वैतरणा नदीवरचा पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे 40 पाड्यांशी संपर्क तुटलाय. उसगावात अडकून पडलेल्या अनेकांना अग्निशमन दलानं बाहेर काढलंय. पावसामुळे भातशेतीचंही मोठं नुकसान झालंय. अहमदाबादकडे जाणारी हायवेवरची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. नालासोपारामधल्या तुळींज रोड, टाकीरोड, सेन्ट्रल पार्क, पाटणकरपार्क, गालानगर आणि संतोष भुवन परिसरात पाणी साचल्याने अनेक भागात रिक्षा बंद आहेत. विरारमध्ये मुसळधार पावसामुळे वैतरणा, भातणे, तानसा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. 4 गावांसह 20 पाड्यांचा संपर्क तुटला आहे. शिरसाड ते वज्रेश्वरी हा रस्ता बंद करण्यात आलाय. तर 60 लोकांना हलवण्यात आलंय. वसईमध्ये तानसा आणि वैतरणा नदी काठच्या गावात पाणी घुसलंय.

ईद पाण्यात

भिवंडीत मुस्लिम बांधवांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे आजच्या रमजान ईदचा सणही त्यांना पाण्यातच साजरा करावा लागतोय. भिवंडीतल्या मंडई, म्हाडा कॉलनी, ईदगाह रोड, संगमपाडा, नदीनाका, तीनबत्ती परिसर या भागांतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. खाडीकिनारी असलेल्या ईदगाह झोपडपट्टीत 5 फूट पाणी साचलं आहे. पाऊस सुरुच असल्यानं पाणी उतरण्याची लक्षणं नाहीत आणि महानगरपालिका कसलीच मदत करत नसल्यानं मुस्लीम बांधवांनी संताप व्यक्त केलाय. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. भिवंडीत झालेल्या भरपूर पावसामुळे निजामपूर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलंय आणि तिथली कागदपत्रं वाचवण्यासाठी पोलिसांना धडपड करवी लागतीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2014 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...