23 जुलै : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट केल्याचं स्टिंग ऑपरेशन खोटे असून त्या व्हिडिओची सीडीही बनावट असल्याचा दावा गुलाबराव पोळ यांचे वकील ऍड. प्रकाश मोरे यांनी आज (बुधवारी) केला. तसेच पत्रकार आशिष खेतान आणि आऊटलूक मासिकाचे संपादक कृष्णप्रसाद यांच्यावर 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा अजूनही कायम ठेवणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. पत्रकार आशिष खेतान यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबल मनीष ठाकूर याच्यामार्फत दाभोलकरांचा मारेकरी कोण? हे शोधण्यासाठी प्लँचेट केल्याचं पोळ यांनी कबूल केलेलं आहे. इतकंच नाही तर मनीष ठाकूर दाभोलकरांच्या आत्म्याला बोलावून प्लँचेट करत असल्याचंही दिसतंय. मात्र, हे स्टिंग ऑपरेशन व दाखविण्यात आलेल्या व्हिडिओची सीडी बनावट असल्याचा दावा आज सकाळी पोळ यांचे वकील ऍड. मोरे यांनी केला आहे.
Follow @ibnlokmattv |