उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, भाजपच्याच जिल्हाध्यक्षाने केली मागणी

उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, भाजपच्याच जिल्हाध्यक्षाने केली मागणी

भाजपच्या जिल्हाध्यक्षाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरीही युतीत काही जागांवर मात्र तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मित्रपक्षाने बंडखोरी केलेल्या जागांवर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडताना दिसत नाहीत. आता तर भाजपच्या जिल्हाध्यक्षाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केला आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान असणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. ही जागा युतीत भाजपच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेनं या जागेवर आपला उमेदवार उभा केल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला AB फॉर्म देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

राणे पितापुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत येणार?

कणकवलीत युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जिथे सेना-भाजप उमेदवार आमने-सामने आहेत त्या मतदारसंघात फडणवीस आणि उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असा करार असल्याचे सांगत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंसाठी मुख्यमंत्री कणकवलीत येतील का, अशी चर्चा आता सिंधुदुर्गात सुरू झाली आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांबद्दल अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे बंडखोर नेते भाजप-शिवसेनेचं गणित बिघडवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

...म्हणून विखेंनी काँग्रेस सोडली, बाळासाहेब थोरातांची UNCUT मुलाखत

Published by: Akshay Shitole
First published: October 12, 2019, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading