मान्सून 2-3 दिवसात तळकोकणात पुन्हा सक्रिय होणार !

मान्सून 2-3 दिवसात तळकोकणात पुन्हा सक्रिय होणार !

  • Share this:

kokan rain_mansoon30 जून : जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. पाऊस नसल्यामुळे शहरीभागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालीय. राज्यातील अनेक धरणात मोजकाचा पाणीसाठा उरला आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसात तळकोकणात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यभरावर लांबलेल्या पावसामुळे पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं असताना हवामान खात्याच्या या अंदाजामुळे दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

येत्या 48 तासांनतर तळकोकणात हलक्या सरींना सुरुवात होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात मान्सून सक्रिय होतोय. येत्या दोन दिवसात तो राज्याच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले. पण मोजक्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्यामुळे सरासरीपेक्षा 42 टक्के कमी पाऊस पडला. स्कायनेट या अमेरिकन संस्थेनुसार कोकण, गोव्यात सरासरीहून 56 टक्के कमी पाऊस पडला असा अहवाल व्यक्त केला. तर यापूर्वी जून महिन्यात एवढा कमी पाऊस 1905, 1923, 1926 आणि 2009 साली पडला होता.

पाऊस गायब!

- या जून महिन्यात सरासरीपेक्षा 42 टक्के कमी पाऊस पडला

- स्कायनेट या अमेरिकन संस्थेनुसार कोकण, गोव्यात सरासरीहून 56 टक्के कमी पाऊस पडला

- यापूर्वी जून महिन्यात एवढा कमी पाऊस 1905, 1923, 1926 आणि 2009 साली पडला होता

- देशात गेल्या जूनच्या तुलनेत फक्त एक-तृतीयांश भागात पेरणी झालीये

- ज्यांनी पेरणी केली, त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय

- गेल्या 13 दिवसांपासून सूरत-नाशिकच्या पुढे मॉन्सून उत्तरेच्या दिशेने सरकला नाही

मुंबईत 20 टक्के पाणीकपात

पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईत नैसर्गिक पाणीकपात सुरू झालीय. मुंबईला जो पाणीपुरवठा होतो, त्यात गुरुत्वाकर्षणाची महत्त्वाची भूमिका असते. पण आता धरण आणि तलावांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाण्याचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे अघोषित पाणी कपात सुरू झालीय. काही दिवसांमध्येच मुंबईत रोज 20 टक्के पाणीकपात करण्याची घोषणा होऊ शकते.

 

कोल्हापूरवर सावट

कोल्हापूरलाही पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. कोल्हापूरला पाणी पुरवठा करणार्‍या बालिंगा आणि शिंगणापूर या योजनांमधून 20 टक्के पाणी उपसा कमी करण्यात आलंय. त्यामुळे अजून पाणी कपात सुरू झाली नसली तरी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. तसंच कळंबा तलावामध्येही फक्त 4 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना तीव्र पाणीटंचाई भासू शकते. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय. तसंच कमी दाबानं पाणीपुरवठा सुरु असलेल्या भागांमध्ये महापालिकेनं टँकरनं पाणीपुरवठा सुरू केलाय.

ठाण्यात होम हवन

जून महिना उलटला तरीही मान्सून सक्रिय झालेला नाही.पाऊस पडावा आणि राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात व्हावी आणि ठाणे जिल्ह्यातली पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी ठाण्यात किसननगरमध्ये स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी होम केला.

गाढवाचं लग्न

जून महिना संपत आला तरी पावसाने हजेरी न लावल्याने चिंताग्रस्त झालेल्या मिरजेतल्या नागरिकांनी चक्क गाढवाचं लग्न लावून दिलं. मिरजेतल्या तोडकर मळा परिसरात वरूणराजाला खुश करण्यासाठी गाढवाचं विधिवत लग्न लावून देण्यात आलं. त्याबरोबर त्यांची वरातही काढण्यात आली. 2002 सालानंतर पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आलाय.

First published: June 30, 2014, 4:05 PM IST

ताज्या बातम्या