22 जून : गेल्या 18 महिन्यांपासून आम्ही आमचं घर वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत. पण, आता आम्ही थकलोय. आता जास्त न ताणता सहकार्य करू... हे बोल आहेत कॅम्पा कोलावासीयांचे... मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी आपलं आंदोलन संपवलंय. मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांचं म्हणणंय. यानंतर पालिका अधिकार्यांना त्यांची कारवाई करू देऊ, त्यांच्या कामात अडथळा आणणार नाही, असं कॅम्पा कोलाचे रहिवासी आशिष जालान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे अधिकारी करवाईसाठी कॅम्पा कोलात जात आहेत. पण रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना काहीच कारवाई करता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी मनसेचे आमदार बाळ नांदगावकर आणि भाजपच्या शायना एन सी यांच्या नेतृत्त्वाखाली कॅम्पा कोला सोसायटीच्या राहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. 'पालिका अधिकार्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्हाला शक्य ती मदत करू', असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांकडे वाढीव एफएसआयची मागणी रहिवाशांनी केलीय. त्यावर कायद्याच्या चौकटीत बसून जे काही शक्य होईल ते करू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यानंतर रहिवाशांचा विरोध मावळला.
पालिका अधिकारी गॅस, वीज आणि पाण्याचं कनेक्शन कापू शकतात. पण, घराच्या चाव्या देणार नाही, असं रहिवाशांनी सांगितलंय. महापालिका अधिकार्यांचा माफी मागत जालान म्हणाले, आम्हाला पालिका अधिकार्यांच्या कामात अडथळा आणायचा नव्हता आणि सुप्रीम कोर्टाचाही अवमान करायचा नव्हता. आम्हाला आमचं घर वाचवायचं होतं. पण आता हे थांबवण्याची गरज आहे.
कॅम्पा कोला सोसायटीतल्या अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका कर्मचारी शुक्रवारी दाखल झाले. पण, रहिवाशांनी गेट लावून त्यांना अडवून धरलं. अधिकार्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. रहिवाशी विरोधकावर ठाम राहिले. त्यामुळे मग अधिकार्यांनी रहिवाशांविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तरीही रहिवाशी आंदोलनावर ठाम राहिले. तीन दिवस हे नाट्य रंगलं. पण, आमदार बाळा नांदगावकर आणि शायना एनसी यांच्या मध्यस्थीनंतर हा पेच आता सुटलाय.
Follow @ibnlokmattv |