'अंतिम निर्णय हायकमांडचाच तोपर्यंत काम करत राहणार'

  • Share this:

cm pruthviraj chavan20 जून : चर्चा मीडियातच सुरू आहे जे काही निर्णय होईल तो कळेलच पण मला अजून कुणी काही सांगितलं नाही, दिल्लीचा निरोप आला तर या चर्चेसाठी जाईल पण मी माझं काम करत राहिल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसंच मला ज्या कामासाठी महाराष्ट्रात हायकमांडने पाठवलं होतं ते काम ताकदीने निभावलं आणि आताही करत राहणार असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेनं जोर धरलाय. राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज यांचं स्थान डळमळीत झालंय. त्याचवेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यकारिणीमध्ये बदल करणार असल्याचं समजतंय.

 

त्यानुसारच, महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकरिणीत बदलाची चर्चा सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना हटवून त्यांच्या ऐवजी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी होतेय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला अनुकूलता दाखवली आहे.

 

दरम्यान, नेतृत्त्वबदलाची चर्चा फक्त मीडियातच होतेय, पक्षश्रेष्ठींनी मला याबाबतीत काहीही कळवलं नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. तर सुशीलकुमार शिंदे आज सकाळी सोलापुरात दाखल झाले. पत्रकारांनी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्याला या विषयावर काहीच बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.

 

तर चेहरा बदलून सरकारची नियत बदलता येत नाही, चव्हाण यांच्याऐवजी कुणीही मुख्यमंत्री झालं तरी सरकारचा पराभव अटळ आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर, तुम्ही महाराष्ट्रात कोणताही मुख्यमंत्री आणा, तरी महाराष्ट्रात मोदी सरकारच येणार आहे, अशा शब्दांमध्ये भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसला कोपरखळी मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2014 04:08 PM IST

ताज्या बातम्या