इराकमध्ये 40 भारतीयांचं अपहरण, परराष्ट्र खात्याचा दुजोरा

इराकमध्ये 40 भारतीयांचं अपहरण, परराष्ट्र खात्याचा दुजोरा

  • Share this:

indian_in_iraq18 जून : इराकमधली परिस्थिती खूपच चिघळलीय. जी भीती व्यक्त केली जात होती ती अखेर खरी ठरलीय. आयसीस या अतिरेकी संघटनेनं 40 भारतीयांचं अपहरण केलंय. परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीला दुजोरा दिलाय.

अपहरण झालेले भारतीय तारिक उर अलहूद या कंपनीत काम करणारे कामगार आहेत. पण त्यांच्या सुटकेसाठी खंडणी मागणारा कोणताही फोन अजून आला नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. अपहरण झालेल्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

दरम्यान, आयसीस संघटनेचे अतिरेकी आता राजधानी बगदादच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे. इतकंच नाही तर त्यांनी इराकमधल्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण फॅक्ट्रीलाही लक्ष्य केलंय. सुदैवाची बाब म्हणजे आदल्या दिवशीच इराकच्या सरकारने ही फॅक्ट्री बंद करून सर्व परदेशी कर्मचार्‍यांना तिथून बाहेर काढलं होतं.

सुन्नी अतिरेकी असलेल्या आयसीसच्या बंडखोरांनी तेलशुद्धीकरण केंद्रावर तोफ आणि मशिनगननी मारा सुरू केलाय. इराक सरकारने तेलशुद्धीकरण केंद्र बंद केलेत आणि तिथल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय. आयसीस संघटनेचे जवळचे 10 हजार सुन्नी अतिरेकी इराक आणि सिरियाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत. आयसीसने ताब्यात घेतलेल्या 44 कैद्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती मिळालीय.

आयसीसची ओळख

- आयसीस म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरिया

- इराक आणि सिरियामध्ये जिहादी कारवाया

- अल कायदाशी संलग्न संघटना म्हणून काम सुरू केलं

- अबू बकर अल-बगदादी हा या संघटनेचा प्रमुख

- 2003 मध्ये अमेरिकेच्या कारवाईनंतर झालेल्या बंडखोरीत बगदादीने भाग घेतला

- इराक आणि सिरियातल्या सुन्नी भागात इस्लामी राज्याची निर्मिती हा उद्देश

- सिरियातल्या भूमध्य समुद्र किनारपट्टीपासून दक्षिण बगदादपर्यंत आयसीसचा प्रभाव

भारताला धोका काय?

- इराकमध्ये मोठं युद्ध झालं तर तिथल्या 18 हजार भारतीयांना फटका

- आयसीसने इराकमधील सत्ता ताब्यात घेतली तर जगभरात अल-कायदाला प्रेरणा मिळेल

- इराकमध्ये दहशतवादाचं नवं नेटवर्क अस्तित्वात येईल

- संपूर्ण मध्य आशियातच राजकीय अस्थिरतेची भीती

- इराकमधल्या अराजकतेचा परिणाम तेलाच्या दरावर होईल

- जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती भडकतील

- त्याचा भारताला मोठा आर्थिक फटका बसेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2014 06:35 PM IST

ताज्या बातम्या