स्पेनचा धुव्वा, नेदरलँडचा ५-१ ने दणदणीत विजय

स्पेनचा धुव्वा, नेदरलँडचा ५-१ ने दणदणीत विजय

  • Share this:

13netherland_win14 जून : फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्या मेगा मुकाबल्यात नेदरलँडने गतविजेत्या स्पेनचा दणदणीत पराभव केला. वर्ल्ड कपच्या इतिहासात गतविजेत्यांचा झालेला हा सर्वात मोठा दारुण पराभव ठरलाय. ग्रुप बीमध्ये कालच्या मॅचमध्ये हॉलंडनं स्पेनला 5-1 असं अक्षरशः नेस्तनाबूत केलं.

 

मॅचच्या सुरुवातीला खरं तर स्पेननं आघाडी घेतली. मॅचच्या 27 व्या मिनिटाला डिएगो कोस्टाला मिळालेल्या पेनल्टीवर झावी अलॉन्सोनं स्पेनसाठी पहिला आणि एकमेव गोल डागला. पण हाफ टाईमनंतर संपूर्ण वेगळी नेदरलँडची टीम बघायला मिळाली. आक्रमणासाठी प्रसिद्ध असलेले रॉबीन व्हॅन पर्सी आणि आर्जेन रॉबीनने आपला धडाका दाखवला. रॉबीन व्हॅन पर्सीने अप्रतिम खेळाचा नमुना पेश करत नेदरलँडसाठी बरोबरी साधली आणि त्यानंतर एका अफलातून पासवर गोल करत 2-1 अशी आघाडीही घेतली.

 

हे कमी की काय लगेच आर्जेन रॉबेननं आपली चमक दाखवली आणि स्पेनवर 3-1 अशी आघाडी घेतली. या धक्क्यातून स्पेन सावरलीच नाही. त्यानंतर डे व्रिजनं आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल नोंदवत ही आघाडी 4-1 वर नेली. यानंतर काही नाही असं वाटत असतानाच आर्जेन रॉबीनने पुन्हा एकदा एका अप्रतिम पासवर गोल डागत आणि अभेद्य वाटणार्‍या ईकर कॅसिआसची खिल्ली उडवत गोल केला आणि स्कोरबोर्डवर 5-1 असे आकडे झळकले. वर्ल्ड कपच्या इतिहासातील गतविजेत्यांचा आणि स्पेनचाही झालेला हा सर्वात दारूण पराभव ठरला आहे.

चाहत्यांचा एकच जल्लोष

ही फक्त स्पेनसाठी काळरात्र नव्हती तर संपूर्ण जगासाठी उत्तम फुटबॉलचा नजराणा नेदरलँडने पेश केला. ही मॅच इतकी कमालीची झाली की दोन्ही बाजूच्या फॅन्सना आपल्या भावना आवरणं कठीण झालं होतं. स्पेनच्या चाहत्यांना जे काही होतंय त्यावर विश्वास बसत नव्हता. स्पॅनिश ऍटॅक फ्लॉप ठरत होता. तर अभेद्य वाटणार्‍या स्पॅनिश डिफेंसची खिल्ली हॉलंडच्या फॉरवर्ड्सनं उडवली. वर्ल्ड कपमधील स्पेनची ही सर्वात खराब सुरुवात ठरलीये. तर दुसरीकडे हॉलंडच्या फॅन्समध्ये तुफान आनंद होता. गतविजेत्यांना आणि ज्यांनी 2010 मध्ये वर्ल्ड कपपासून नेदरलँडला दूर ठेवलं, त्या पराभवाचा वचपा काढल्याचा आनंद आणि समाधान हॉलंडच्या फॅन्सनं साजरा केला.

First published: June 14, 2014, 11:53 AM IST

ताज्या बातम्या