काँग्रेसमध्ये पुन्हा 'मुख्यमंत्री हटाव' मोहीम ?

काँग्रेसमध्ये पुन्हा 'मुख्यमंत्री हटाव' मोहीम ?

  • Share this:

565cm_maharashtra12 जून : लोकसभेत दारुण पराभवानंतर विधानसभेला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून काँग्रेसमध्ये मात्र 'मुख्यमंत्री हटाव' मोहीम पुन्हा जोर धरु लागली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात राज्यात काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची जी धूळधाण झाली त्याचं खापर मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर फोडण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेसमध्ये देशात फेरबदल होतील असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रमधल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपली मोहीम उघडली आहे. ही मोहीम मुख्यमंत्री हटाव या कारणासाठीच सुरू आहे.

पण काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व मात्र सध्या पराभवाचे खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडून त्यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही असं म्हटलं जातंय. दरम्यान, राज्यात नेतृत्वबदलाची शक्यता नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पराभवानंतर काँग्रेसच्या 4 कोर कमिटीच्या बैठकी झाल्या आहेत. दरम्यानच्या काळातच मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळ विस्तार करू दिलाय. हा सुद्ध मुख्यमंत्र्यांच्या बाजूचे संकेत आहेत असं म्हटलं जातंय.

पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांवर दबाव कायम रहावा यासाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्री विरोधी गटाने ही आक्रमक भूमिका घेतल्याचं म्हटलं जातंय.

विशेष म्हणजे लोकसभा निकालाच्यानंतर पुण्यात काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. यासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीवारीही करावी लागली पण हायकमांडने मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. तर मुख्यमंत्री बदल हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मुख्यमंत्री बदलानं काही फरक पडणार नाही, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

First published: June 12, 2014, 3:56 PM IST

ताज्या बातम्या