04 जून : भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरतेय. रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल या अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या कारला काल सकाळी नवी दिल्लीत इंडिका कारनं धडक दिली. त्यात मुंडे यांचा मृत्यू ओढावला. पण, हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी या घटनेचे संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली. तर राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आणि गोपीनाथ मुंडेंचे पुतणे, आमदार धनंजय मुंडे यांनीही आता अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी केली. मुंडेंच्या पार्थिवावर आज परळीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांना भावना अनावर झाल्या होत्या. या समर्थकांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.