04 जून : लोकनेता, महाराष्ट्राचा झुंजार नेता, केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना लाखो जनसमुदयाच्या उपस्थित साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. "परत या परत या मुंडेसाहेब परत या","अमर रहे अमर रहे, गोपीनाथ मुंडे अमर रहे"च्या घोषणांनी आपल्या लाडक्या नेत्यांला लाखो कार्यकर्त्यांनी भावपूर्ण निरोप दिला. गोपीनाथ मुंडे यांच्या गावी परळी इथं वैद्यनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणात मुंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची बातमी आल्यापासून धीरोदत्तपणे सगळ्या गोष्टींना सामोरी जाणारी आणि सगळ्यांना आधार देणारी त्यांची मोठी मुलगी पंकजा पालवे -मुंडे यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. दुपारी 12.20 च्या सुमारास मुंडे यांचं पार्थिव परळीत आणण्यात आलं. दुपारी पावणेदोन वाजता, आर्य समाज पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यात लपटलेलं मुंडे यांचं पार्थिव त्यांनीच नावारूपाला आणलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
भर उन्हाची तमा न बाळगता परळीकरांनी लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती. ठिकठिकाणाहून लाखो कार्यकर्ते वैद्यनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणात हजर होते.यावेळी गेल्या दोन दिवसांपासून आपल्या लाडकाच्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी अधीर झालेल्या कार्यकर्त्यांचा अश्रूचा बांध फुटला होता. अंत्यदर्शन घेण्यासाठी काही काळ गोंधळही उडाला होता. भाजप नेते पाशा पटेल आणि प्रकाश जावडेकर यांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. शांत राहा, पोलिसांना सहकार्य करा, साहेबांच्या सन्मान राखा असं भावनिक आवाहन पंकजा पालवे यांना करावं लागलं. आवाहन करताना पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले होते. पंकजा यांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी शांतता बाळगली.
गोपीनाथ मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भाजपचे नेते राजनाथ सिंग, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी हजर होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, गृहमंत्री आर.आर.पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. मुंडेंना अखेरचा निरोप दिल्यानंतर सर्व नेते एकाच विमानाने एकत्र मुंबईला निघाल्याचे चित्र पाहण्यास मिळालं. तर आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाची चौकशी व्हावी यासाठी परळीकरांनी आर.आर.पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या गाड्याला घेराव घातला होता. मुंडेंच्या निधनाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी परळीकरांनी केलीय. अत्यंत भावपूर्ण वातावरणात लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यात आला. या लोकनेत्याला आयबीएन लोकमतची भावपूर्ण आदरांजली.
=================================================
संबंधीत बातम्या
Follow @ibnlokmattv |