मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, 2 मंत्र्यांनी घेतली शपथ

मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, 2 मंत्र्यांनी घेतली शपथ

  • Share this:

deshmukh sattar

2 जून : कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळाचा आज अखेर विस्तार झाला. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. सत्तार यांना कॅबिनेट मंत्री म्हणून, तर देशमुख यांना राज्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. शपथविधीसाठी विलासराव देशमुखांचे कुटुंब हजर होते. राज्यपाल के शंकरनारायण यांनी दोघांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आई वैशाली देशमुख, भाऊ रितेश, वहिनी जेनेलिया, भाऊ धीरज आणि वहिनी आणि काका दिलीप देशमुख या कार्यक्रमाला हजर होते. या दोघांकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाणार हे स्पष्ट झालेलं नाही.

राज्यात काँग्रेसकडील तीन मंत्रिपदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे बैठकांच्या फेर्‍या झाल्या. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज दुपारी चारचा मुहूर्त ठरला होता. मात्र, काँग्रेसच्या घोळामुळे शपथविधी झाला नाही. यावरून मुख्यमंत्री जोरदार टीकेचे लक्ष्य ठरले होते. नव्या मंत्र्यांची नावे निश्‍चित होत नसल्याने काँग्रेसचे नेते गोंधळले होते. अखेर मुख्यमंत्री चव्हाण यांना तीनपैकी दोन मंत्रिपदे भरण्याची परवानगी पक्षश्रेष्ठींकडून आज रात्री दहाच्या सुमारास मिळाली.

दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारावरून काल काँग्रेसवर नामुष्की ओढावली. याचाच धागा पकडत हे मुख्यमंत्री सर्वात लाचार मुख्यमंत्री असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. तर काल मंत्रिमंडळ विस्तार आयोजित केलेलाच नव्हता, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

First published: June 2, 2014, 10:28 AM IST

ताज्या बातम्या