'फँड्री'चा सातासमुद्रापार झेंडा

'फँड्री'चा सातासमुद्रापार झेंडा

  • Share this:

fandery14 एप्रिल : समाज व्यवस्थेबद्दल डोळ्यात झणझणीत अंजन घालणार्‍या फँड्रीने सातासमुद्रापार झेंडा फडकावला आहे. अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे नुकत्याच झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवात नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्रीने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट ज्युरी पुरस्काराने फँड्रीला गौरवण्यात आले. आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या फँड्रीच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

अनेक राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कार पटकावणार फँड्री फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला. अपेक्षेप्रमाणे सिनेरसिकांनी फँड्रीला डोक्यावर घेतलं. सिनेमा म्हणून पाहिलं तर फँड्रीमध्ये जब्याची एकतर्फी लव्हस्टोरी आहे, काळ्या चिमणीचा सस्पेन्स आहे, नागराजने स्वत: साकारलेल्या चंक्या या व्यक्तिरेखेचं गूढ आहे, बाप-मुलाचा संघर्ष आहे, पाठलाग आहे.

तसंच रोजगार हमी योजनेची कामं, काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शहराच्या तुलनेत गावातलं रखरखीत जगणं, तर गावात जत्रेशिवाय कपडे घेणं शक्य नाहीये, गावातल्या कोणत्याही जमातीत अगदी उघडपणे होणारा हुंड्याचा व्यवहार, गावातल्या रिकामटेकड्या जगण्यात हातातल्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, पण घरात लोडशेडिंगमुळे दिवसाउजेडी अंधार आहे. हाताला काम नसलं तरी डोक्यात आयपीएलची नशा आहे, अशा अनेक गोष्टी नागराजने अगदी सूचकपणे सतत पेरलेल्या आहेत.

या गोष्टी सहजपणे सिनेमात येत राहतात आणि त्याच सहजतेने मुख्य कलाकारांचं जगणं, त्यांची सुख-दु:खं, त्यांचं हतबल होणं पडद्यावर दिसत राहतं, त्यांच्या वेदनेशी आपणही अगदी लगेच एकरुप होऊन जातो आणि तेच या फँड्रीचं सगळ्यात मोठं यश आहे. फँड्रीमध्ये किशोर कदम, नायक जब्या, त्याचा मित्र पिर्‍या यांच्या भूमिकानी फँड्रीला साज चढवल्याय. याचीच दखल घेत अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे भारतीय चित्रपट महोत्सवात फँड्रीला सर्वोत्कृष्ट ज्युरी पुरस्काराने गौरवण्यात आलंय.

First published: April 14, 2014, 9:16 PM IST

ताज्या बातम्या