डहाणूजवळ गॅस टँकर उलटून स्फोट, 8 ठार

डहाणूजवळ गॅस टँकर उलटून स्फोट, 8 ठार

  • Share this:

dhanu22 मार्च : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणूजवळ चारोटी इथं एक गॅस टँकर उलटून भीषण स्फोट झाला त्यानंतर टँकरला भीषण आग लागली. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर 17 जण जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

मृतांमध्ये एकाच घरातील चार जणांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. जखमींवर ठाण्याच्या शासकीय रुग्णालय आणि कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात भूषण पाटील हा पोलीस कर्मचारी जखमी झालाय.

दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास रिलायन्स कंपनीचा जी.जे.06 झेडझेड 7918 हा टँकर गुजरातकडून मुंबईकडे जात असताना चारोटीजवळ चालकाचा ताबा सुटला आणि टँकर रस्त्यावर उलटले. काही कळायच्या आत एक भीषण स्फोट झाला आणि टँकरने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत गाडीच्या चालकासह रस्त्याच्या कडेल्या असलेल्या थांब्यावर उभ्या असलेल्या निष्पाप लोकांचा होरपळून मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. तसंच या आगीत आठ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

खबरदारी म्हणून रस्त्यालगतची दुकानं काही काळासाठी बंद करावी लागली होती. या अपघातामुळे दोन तास दोन्ही मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. फायर बिग्रेडच्या 4 गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश आलं. दरम्यान, चारोटी उड्डाणपुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र आयआरबी कंपनी याकडे दुर्लक्ष करतेय. आतापर्यंत या ठिकाणी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

First published: March 22, 2014, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading