राज्यभरात 23 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

राज्यभरात 23 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

  • Share this:

Image img_149012_farmarsusud_240x180.jpg18 मार्च : गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपल्यानंतर शेतकर्‍याचं पीक संकटातून वाचू शकलं नाही आणि आता हतबल झालेल्या शेतकर्‍यानंही स्वत:चं आयुष्य संपवण्याचा मार्ग स्विकारलाय. एक दोन नव्हे तर तब्बल 23 शेतकर्‍यांनी आत्तापर्यंत आपली जीवनयात्रा संपवली. विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे मन विषण्ण करणारं हेच चित्र दिसून येतंय.

शेतकर्‍यांच्या जीवांची ही मोजदाद आकडेवारीत सांगता येणार नाही. पण, सरकारला आकड्यांचीच भाषा कळते. विदर्भात 6, नाशिकमध्ये 6, औरंगाबादमध्ये 10, सांगलीत एका शेतकर्‍यानं आत्महत्या केलीय. संपूर्ण राज्यात तब्बल 17 लाख हेक्टर वरच्या पीकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे कर्ज फेडणार कसं, हा प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय.

उभं पीक आडवं झालं... कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, हे कळेना ! बँकेच्या पासबुकावर उरलेली रक्कम अगदीच थोडी. त्यातुलनेत देणी फेडणार कशी ? या चिंतेने शेतकरी ग्रासलेत. संपूर्ण राज्यात तब्बल 17 लाख हेक्टर वरच्या पीकाचं मोठं नुकसान झालंय. पीक विम्याचा आधार नाही, कर्जमाफीची घोषणा नाही. आपत्कालीन मदतही आचारसंहितेच्या लालफितीतत अडकलीय. शेतकर्‍याच्या आत्महत्यांनंतर अख्ख्या कुटुंबावर कोसळलेला आघात मोठा आहे.

डोळ्यांसमोर उभं पिक आडवं झालंय. त्याच्या नुकसान भरपाईबद्दल कोणी शब्द काढत नाही.त्यामुळे निराश होऊन उस्मानाबाद तालुक्यातल्या आळणी गावातल्या अनिल कुलकर्णीनं आपलं आयुष्य संपवलं. गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचं मोठं नुकसानं झाल्याने विहिरीत उडी मारून अनिलनं जीव दिला. तर उस्मानाबादच्याच कळंबमध्ये राजाभाऊ लोमटे यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत: ला जाळून घेतलं होतं. त्यांचाही आज मृत्यू झालाय. गारपिटीनं राजाभाऊंची आंब्याची बाग आण ज्वारीचं पिक पूर्णपणे उध्वस्त झालं होतं. नांदेडमधल्या हदगाव तालुक्यातल्या कोहाडी गावात यादव पतंगे या 65 वर्षांच्या शेतकर्‍यानं आत्महत्या केली. तर हिंगोलीत भीमराव गोडबोले या 40 वर्षांच्या शेतकर्‍यानं रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतलं.

वर्धा जिल्ह्यालाही गारपिटीचा मोठा तडाखा बसला. कुरझडी गावात अजबराव कडू या शेतकर्‍यानं विष पिऊनआत्महत्या केलीये. उत्तर महाराष्ट्रातही गारपिटीनं अनेक संसार उध्वस्त केलेत. जळगाव जिल्ह्यातला एरंडोल तालुक्यातल्या पिंपरकोठा गावातल्या सुखदेव हटकर या शेतकर्‍यानं आत्महत्या केली. गहू, मिरची ही पिकं संपूर्णपणे उध्वस्त झाल्यानं गळफास घेऊन हटकर यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करलाय.

औरंगाबादमध्ये पैठण तालुक्यात दिगंबर राऊत या शेतकर्‍यानं ही गळफास घेतला. दिगंबर यांचं डाळींब आणि गव्हाची शेती होत्याची नव्हती झाली. त्याचबरोबर विदर्भातही नागपूर जिल्ह्यात एका 24 वर्षांच्या तरूण शेतकर्‍याने आत्महत्या केली.

पण सरकारला मात्र अजूनही जाग येत नाहीये. या हंगामासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं हा शन या शेतकर्‍यांसमोर आहे. पण पीक कर्जमाफी मिळेल का यावर शरद पवारांचं उत्तर धक्कादायकच आहे. तर येत्या 4-5 दिवसांत मदतीबद्दल निर्णय झाला नाही, तर रस्त्यावर उतरू असा इशारा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिलाय.

अस्मानी संकट कोसळल्यावर या बळीराजाला अपेक्षा होती ती किमान दिलासा देण्याची..पण तो तर मिळाला नाहीच..त्याउलट शेतकर्‍याला वाट पहावी लागतेय, ती आपली हक्काची मदत मिळण्याची. आचारसंहितेच्या नावाखाली मदतीची साधी घोषणाही केली जात नाहीये, पण दौरे मात्र होत आहे. पंचनाम्यांच्या नावाखाली आधीच होरपळलेल्या शेतकर्‍याला लुटलं जातंय...आयुष्य संपतायेत...संसार उध्वस्त होतायेत..आणि राज्यातले नेते मात्र निवडणुकीच्या प्रचारात रंगतायेत..

नेते मात्र निगरगट्ट

एकाच दिवसांत आठ शेतकर्‍यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून कुठल्याही संवेदनशील माणसाचं मन हेलावल्याशिवाय राहणार नाही. पण, आपले नेते मात्र निगरगट्ट झालेत. ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून काय होणार, असा अत्यंत असंवेदनशील सवाल खुद्द केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विचारलाय. तर सरकारला बदनाम करण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतोय, असा खोटा प्रचार केला जात असल्याचं राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांचं पीककर्ज माफ करावं, अशी मागणी होतेय. पण पीककर्ज माफ करण्याचा निर्णय सरकार नाही तर बँका घेऊ शकतात, अशी कातडीबचाव भूमिका पवारांनी घेतलीय. केंद्रानं शेतकर्‍यांना 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. त्यावेळी मात्र याचं श्रेय लाटण्यासाठी पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसनं गावोगावी पोस्टर्स लावली होती, याचा विसर पवारांना पडलेला दिसतोय.

First published: March 18, 2014, 11:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading