गेल्या 24 तासांत 8 शेतकर्‍यांनी संपवलं आयुष्य

गेल्या 24 तासांत 8 शेतकर्‍यांनी संपवलं आयुष्य

  • Share this:

234marathvada_farmar18 मार्च : अअस्मानी संकट आता बळीराजाच्या जीवावर लोटले आहे. गारपिटीनं झालेलं नुकसान आणि सरकारकडून मदत मिळण्यात होत असलेली दिरंगाई यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू झालंय. गेल्या 24 तासात राज्यात 8 शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलंय. यातल्या चार आत्महत्या तर मराठवाड्यातील आहेत. औरंगाबाद, हिंगोल, नांदेड आणि उस्मानाबादमध्ये शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागिल आठवड्यातही मराठवाड्यात 4 शेतकर्‍यांना आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील कुरझडी गावात अजबराव कडू या शेतकर्‍यांने विष पिऊन आत्महत्या केलीये. उपचारासाठी तातडीने त्यांना श्रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यातल्या बोरगाव येथील 24 वर्षीय विजय धोटे या गारपीटग्रस्त शेतकर्‍यानं आत्महत्या केली.

तसंच उस्मानाबादमध्ये आळणी गावात गारपिटीमुळे आणखी एका शेतकर्‍याची आत्महत्या अनिल कुलकर्णी या शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारपासून त्यांचा मृतदेह विहिरीत पडून होता. आज मृतदेह पाण्यामुळे फुगुन विहिरीच्या काठाशी तरंगताना आढळून आला. गहू,ज्वारी ,हरभरा, या पिकांचे नुकसान झाल्यामुळे कुलकर्णी यांनी आत्महत्या केली.

नांदेड हादगाव तालुक्यातील कोहाडी गावातील 65 वर्षीय यादव पतंगे या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनं गळफास लावून आत्महत्या केली. तर हिंगोली जिल्ह्यातील हिवरा गावचे भीमराव गोडबोले या 40 वर्षीय शेतकर्‍यांने आत्महत्या केली. अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दिगंबर राऊत या शेतकर्‍यांने विष पिऊन आत्महत्या केली. गारपिटीमुळे डाळींब,गहू या पिकांचं नुकसान झाल्यामुळे दिगबंर राऊत यांनी आत्महत्या केली.

तर उस्मानाबाद येथील कळंब तालुक्यात आंब्याची बाग आणि ज्वारीपीकाचं नुकसान झाल्याने हताश शेतकरी राजाभाऊ लोमटे यांनी शनिवारी 15 मार्च रोजी स्वत:ला शेतातच जाळून घेतलं होतं. ते 80 टक्के भाजले होते. त्यांच्यावर लातूरमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला.

आणि जळगावमध्ये एरंडोल तालुक्यातील पिंपरकोठा गावातील सुकदेव हटकर या शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या केली. गारपीटीमुळे गहू,दादर मिरची पिकांचं नुकसान झाल्यामुळे हटकर यांनी आत्महत्या केली.

पीककर्ज माफीची जबाबदारी बँकांची - शरद पवार

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू असताना सरकारला मात्र अजूनही जाग आली नसल्याचं दिसतंय. गारपीटग्रस्तांची मदत लालफितीत अडकलीय. गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांचं पीककर्ज माफ करावं अशी मागणी होतेय. पण ही जबाबदारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बँकांवर ढकललीय. पीककर्ज माफी देण्याचा निर्णय सरकार नाही तर बँका घेऊ शकतात असं पवारांनी म्हटलं आहे. तसंच गारपिटीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून काय फायदा असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. काही वर्षांपूर्वी सरकारनंच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली होती. पण आता पवार यासाठी बँकांकडे बोट दाखवत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. गारपिटीवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्रीय मंत्रिगटाची दिल्लीत बैठक होतेय.

भाजपचा आंदोलनाचा इशारा

सरकारने गारपीट राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं आणि तातडीने शेतकर्‍यांना मदत द्यावी, येत्या चार-पाच दिवसात शेतकर्‍यांना मदत जाहीर झाली नाही तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली.

First published: March 18, 2014, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading