Elec-widget

मित्राला सांभाळा, अन्यथा डोक्यात धोंडा पडेल!- उद्धव

  • Share this:

Image img_120862_fluddhav._240x180.jpg13 मार्च :  उद्धव ठाकरे आणि राजीव प्रताप रूडी यांच्या भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेमधला तणाव संपला असं वाटत असतानाच शिवसेनेने आज (गुरूवार) आपले मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्रातून भाजपच्या नव्या खेळीवर खडे बोल सुनावले आहेत.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला दोन प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांची शिवसेनेची समजूत काढताना धावाधाव होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज 'सामना'तून जाहिर केलेले मत महत्त्वाचे मानले जात आहे.

'बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना देऊन बाहेर पडणार्‍या फुटीरांशी भाजपचे नेते आलिंगन देत' असल्याची टीका सामना मधून करण्यात आली आहे. हाच युतीचा धर्म आहे का असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आला आहे. हे सांगताना त्यांनी गुजरातचं उदाहरणही दिले आहे. 'गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला यांनी भाजप सोडताना शिवसेनेत आमदारांसह प्रवेश करून राज्यात सरकार स्थापन करण्याची ऑफर वाघेलांनी बाळासाहेबांना दिली होती, मात्र त्यावेळी भाजपसारख्या मित्रपक्षाच्या पाठित खंजिर खुपसून सरकार आणण्याचा हलका विचार बाळासाहेबांनी कधीच केला नाही' असंही भाजपला सुनावले आहे.

त्याचबरोबर, 'इतर राज्यांमधले भाजपचे मित्रपक्षही भाजपबाबत नाराज आहेत. ही अशीच स्थिती राहिली तर भाजप हा मैत्रीला जपणारा आणि विश्वासाचे नाते जपणारा पक्ष नाही' अशी प्रतिमा तयार होईल असा इशाराही सामनात देण्यात आली आहे.

शिवसेनेचं 'टेंगूळ' आख्यान

Loading...

- आमच्या सांगण्यावरून नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, राजीवप्रताप रूडी यांनी अचानक फुटलेल्या टेंगुळांवर झंडू बाम चोळला आहे. हे खरे असले तरी पुन्हा डोमेस्टिक व्हायोलन्स होणार नाही व टेंगुळ येणार नाहीत याची गॅरंटी काय ?

- भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण त्याचे 'राष्ट्रीय'पण शिवसेनेसारख्या पक्षांवर टिकून आहे

- युती एकाशी आणि सौदेबाजी दुसर्‍याशी अशी अजब भूमिका भाजप घेतं अशा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत.( सामनात नव्हे. तेव्हा उगाच सामनाच्या नावे आगपाखड करू नये )

- नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या घोड्यावर बसवायचे असेल तर विश्वास निर्माण करावे लागेल, त्याशिवाय विश्वास मिळत नाही. शिवसेना स्वत:ची लढाई लढण्यास समर्थ आहेच, पण साथ देणार्‍या मित्रांना खड्यासारखं बाजूला साराल तर अविश्वासाचा धोंडा डोक्यात पाडून घ्याल.

- आज महाराष्ट्रात जी चुंबाचुंबी सुरू आहे, तशी चुंबाचुंबी शिवसेनेने वाघेलांशी केली नाही म्हणूनच नंतर नरेंद्र मोदींचा गुजरातमध्ये सूर्योदय होऊ शकला.

- क्षणिक सुखासाठी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या फुटीरांच्या गळ्यात गळे घालण्यापूर्वी मित्रवर्यांनी इतिहासाची पाने ती चाळावयास हवीत...!

आमच्या मित्रपक्षाला मनसे अस्पृश्य नाही

दरम्यान, शिवसेनेने भाजपवर दैनिक सामनातून टीका केल्यानंतर भाजपतही शिवसेनेबद्दल अजूनही अस्वस्थता आहे. ठाण्यात शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला आणि अंबरनाथमध्ये शिवसेना - मनसे एकत्र आहेत तर मग राजकीय अस्पश्यतेचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. IBN लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आमच्या मित्र पक्षाला मनसे अस्पृश्य नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला वाटत की महाराष्ट्राचा आमचा नेता मोठा झाला पाहिजे . पण कृती करताना मात्र महाराष्ट्राचा नेता देशाच्या पातळीवर मोठा व्हावा असं राज्यात पहायला मिळत नाही हीच आमची अडचण आहे अशा कडक शब्दात मुनगंटीवार यांनी आपल्या मित्रपक्षावर टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2014 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...