महायुतीत महाधुसफूस, आता गोपीनाथ मुंडे नाराज

  • Share this:

munde on sharad pawar12 मार्च : भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यात यश येतं न येतं तोच आता भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपचा नेता कोण, हे विचारणार्‍या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रात नेते आहेत, असं स्पष्ट उत्तर भाजपनं दिलं. पण, फडणवीसांना अधिकार दिल्यानं गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची आज (बुधवारी) मुंबईत बैठक होती. या बैठकीला मुंडे गैरहजर होते. पण मुंडे गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यावर गेल्यामुळे ते बैठकीला आले नाहीत, अशी सारवासारव आता भाजप नेत्यांनी केली. तसंच महाराष्ट्रात भाजपचे निर्णय कोण घेतं हे उद्धव ठाकरेंनाही माहीत आहे आणि महाराष्ट्रालाही माहीत आहे. हा काही यक्ष प्रश्न नसल्याचं सांगत गोपीनाथ मुंडेंनी भाजपला घरचा अहेर दिलाय.

भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहे. याबद्दल त्यांनी थेट भाजपला धारेवर धरत राज्यात भाजपला अधिकार घेण्याचा निर्णय कुणाला असा सवाल उद्धव यांनी विचारला. उद्धव यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी संध्याकाळी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव यांची भेट घेतली आणि राज्यात निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना आहे असं सांगितलं. रुडी यांच्या उत्तरामुळे गोपीनाथ मुंडे नाराज झाले. महाराष्ट्रात भाजपचे निर्णय कोण घेतं हे उद्धव ठाकरेंनाही माहीत आहे आणि महाराष्ट्रालाही माहीत आहे अशी प्रतिक्रिया देत मुंडेंनी पक्षालाच घरचा अहेर दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2014 07:24 PM IST

ताज्या बातम्या