राज्यात गारपिटीचा कहर सुरूच

राज्यात गारपिटीचा कहर सुरूच

  • Share this:

garpith209 मार्च :  गेल्या 8 दिवसापासून मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढलं आहे. केद्रींय कृषीमंत्री शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून गारपीटग्रस्तांना भागांना भेटी देत आहेत. काल त्यांनी परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांना भेट दिली. तिथिल परिस्थीतीची माहिती घेत तिथल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची विचारपूस केली. एकंदरीत किती भाग नुकसानग्रस्त झालाय ह्याचा आढावा त्यांनी घेतला. आज शरद पवार बीड जिल्हयातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करतायत. सकाळी 9 ते 2 पर्यंत पवार बीड जिल्ह्यातील विविध गारपीटग्रस्त गावांना भेटी देऊण तिथल्या शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.

मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, बीड, माजलगाव, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड या सर्व जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाले आहेत. तर विदर्भातील बुलडाणा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस आणि प्रचंड मोठ्या आकाराच्या गाराही पडल्या त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या तीनही जिल्ह्यात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, बुलडाण्यातील लोणार, धाड आणि चिखली तर अकोल्यातील तेल्हारा येथे गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. तासाभरात झालेल्या पावसामुळे शेडनेट आणि फळबागांचे नुकसान झाले.

वाशिम : शेकडो मेंढ्या, बकर्‍यांचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या अस्मानी संकटाने शेतकर्‍यांसोबतच पशुधनाचं जगणं असह्य करुन टाकलं आहे. जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यात काल झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे चरण्याकरिता गेलेल्या शेकडो मेंढ्या, बकर्‍यांचा मृत्यू झाला. तर 100 ते 200 ग्रॅम वजनाच्या गारांचा वर्षाव सतत एक ते दीड तास गारा पडल्यानं घरांवर बर्फाचे ढीग साचून अनेक घरांची पडझड झाली आहेत. या प्रकाराने गावकर्‍यांसह पशुपालक हादरुन गेलेत तर रस्ते पूर्णत: बर्फमय झाल्याचे चित्र गावात आहे.

बुलडाणा : आस नुकसान भरपाईची

बुलडाणा जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी गारपीट झाली आहे. गेली तीन दिवस जिल्ह्यात मोठ-मोठ्या गारा पडत आहेत. त्यामुळे इथले शेतकरीसुद्धा हवालदिल झाले आहेत. त्यांनाही आता आस लागलीय ती नुकसान भरपाईची.

बीड : 50 कोटींपेक्षा जास्त नुकसान

बीड जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 50,000 हजार हेक्टर पेक्षा जास्त हेक्टरवरील शेतजमिन बाधित झाली आहेत. यात प्रामुख्याने फळबागा,भाजीपाला तसंच रब्बी हंगामातील पीकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा, परळी तालुक्यातील मांडवा ,वडवळी तालुक्यातील पिंपरखेड,ताडसुन्ना या गारपीट ग्रस्त भागांना केंद्रीय कृषीमंत्री भेट देणार आहेत. या भागांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. 50 कोटींपेक्षा जास्त नुकसान बीड जिल्ह्यात झालं आहे. अनेक शेतकरी हवालदिल झाले असून या शेतकत्र्यांना दिलासा देण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज या परिसराचा दौरा करणार आहेत.

पुणे : वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

पुणे जिल्ह्यातल्या मोठ्या परिसराला काल गारपीटीचा तडाखा बसला. बारामती, इंदापूर परिसरामध्ये दुपारपासून मोठ्या प्रमाणावर गारपीटीला सुरुवात झाली. या संपुर्ण परिसरामधल्या गहु, ज्वारी, डाळींब आणि द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे. संपूर्ण बारामती परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात संध्याकाळी वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडला. काही जनावरंही या गारपिटीमुळे जखमी झाली आहेत. या परिसरामध्ये तहसीलदारांनी दौरा केला. साधारणपणे 20 कोटी रुपयांचं नुकसान इथे झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंडेंचा इशारा

'सरकारनं जर त्वरित मदतीसाठी पाऊलं उचलली नाहीत, तर रस्त्यांवर उतरू', असा इशारा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना अपेक्षा आहे ती सरकारी मदतीची.

 

First published: March 10, 2014, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading