मनसे लोकसभेच्या रिंगणात,मोदींना देणार पाठिंबा !

मनसे लोकसभेच्या रिंगणात,मोदींना देणार पाठिंबा !

  • Share this:

raj angrey09 मार्च : लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लढविणार असून, निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसंच यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या 7 उमेदावारांची यादी जाहीर केली.

लोकसभा निवडणुकीसाठी मनसे लोकसभेच्या रिंगणात उतरली. अलीकडेचे भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी मनसेला लोकसभा निवडणूक लढू नये असं आवाहन केलं होतं. पण राज यांनी 'पत्ते पे पत्ता' टाकत नवी रणनीती आखली आहे. मनसे लोकसभेची निवडणूकही लढवणार आणि भाजपला पाठिंबाही देणार असं राज यांनी जाहीर केलंय.

मुंबईत ष्णमुखानंद हॉलमध्ये हजारो मनसे शिलेदारांच्या उपस्थितीत आठव्या वर्धापन दिनानिमित्तचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. यासाठी त्यांनी पहिल्या सात उमेदवारांची यादी जाहीर केली. पण आपले उमेदवारी निवडून आले तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील असंही राज यांनी जाहीर करुन टाकलं. यावेळी  'एम एन एस अधिकृत' या नावाने मनसेच्या अधिकृत ऍपचे उदघाटन राज यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले.

मनसेचे सात उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेनं आपल्या सात उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये दक्षिण मुंबईमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिलीय. तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या विरोधात दक्षिण मध्य मुंबईमधून आदित्य शिरोडकर यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर पश्चिम मुंबई मधून अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि शिवसेनेचे नेते डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यात बिग फाईट पाहण्यास मिळणार आहे इथं मनसेनं राजीव पाटील यांना उमेदवारी दिलीय. तर शिरुर मतदारसंघातून पहिल्यांदाच मनसे लोकसभेला सामोरं जात आहे. इथं अशोक खंडेभराड यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर नाशिकमध्ये डॉ.प्रदीप पवार यांना उमेदवारी दिलीय. पुण्यात दीपक पायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली.

राज ठाकरे गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार

गेल्या दोन आठवड्यापासून विदर्भ,मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिकं जमीनदोस्त झालीय. भाजपचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी गारपीटग्रस्त भागाला मदत करावी अशी मागणी केलीय. राज यांनी खडसेंच्या मागणीच समर्थन केलंय.  गारपीटीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित सर्व पाहणी करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करावी. तसंच येत्या दोन ते तीन दिवसांत आपण या भागाचा दौरा करणार असल्याचा जाहीर केलं. आचारसंहितेचा विषय मध्ये न घेता सरकारने शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

 

उमेदवारांची यादी - 

  • दक्षिण मुंबई      - बाळा नांदगावकर
  • दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर
  • उत्तर पश्चिम मुंबई  - महेश मांजरेकर
  • कल्याण          - राजीव पाटील
  • शिरूर           - अशोक खंडेभराड

  • नाशिक          - डॉ. प्रदीप पवार
  • पुणे             - दिपक पायगुडे

First published: March 9, 2014, 1:51 PM IST

ताज्या बातम्या