नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करा : कोर्ट

नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करा : कोर्ट

  • Share this:

navaneet rana case05 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय. नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल महानगर दंडाधिकारी एस.बी.बागडे यांनी हे आदेश दिले आहे. मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे असं कोर्टाने म्हटलंय. न्यायालनानं दिलेल्या आदेशाची प्रत मुलुंड पोलीस स्टेशनला देण्यात आलीय. पण पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही.

नवनीत कौर कुंडलेस. एके काळच्या दक्षिणेतल्या या अभिनेत्री अमरावतीच्या सूनबाई झाल्या आणि त्यांना राजकारणाचे वेध लागले. रवी राणांचं बस्तान असलेल्या अमरावती जिल्ह्यातूनच पत्नीलाही लोकसभेत पाठवावं, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

अमरावती लोकसभेची जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यामुळे नवनीत कौर यांची पंचाईत झाली. कारण त्या पंजाबमधल्या लव्हाणा गाढा या ओबीसी समाजातल्या आहेत. स्वतःची जात बदलवून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कागदपत्रांमध्येही फेरफार करण्याचे अनेक प्रयत्न केले. नवनीत यांचे वडील हरभजन कुंडलेस हे मूळ पंजाबमधल्या खोकरचे रहिवासी असूनही त्यांनी महाराष्ट्रात तीन ठिकाणहून जन्म आणि रहिवासी प्रमाणपत्रं मिळण्याचे प्रयत्न केले. त्याचे सर्व पुरावे आयबीएन लोकमतच्या हाती लागले.

- नवनीत यांच्या वडिलांनी आपला जन्म ठाण्यात झाला, असं दाखवून जात प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला

- शिवसेनेच्या 2 आमदारांची लेखी विनंती असतानाही, ठाण्याच्या तहसीलदारांनी हा प्रयत्न हाणून पाडला

- त्यानंतर त्यांनी आपला जन्म डहाणूमधल्या ढेकाळे गावात झाल्याचं दाखवलं

- पालघरच्या तहसीलदारांनी जात प्रमाणपत्र नाकारलं

- पण तिसर्‍यांदा कुर्ला तहसीलदारांकडे अर्ज करताना शाळेच्या टीसीवर मात्र 'बम्बई'चं जन्म प्रमाणपत्र जोडलं

- यात 1958 मध्ये शाळा सोडल्याचा टीसी दिलाय, पण ही शाळाच 1964 सुरू झालीये

- ही टीसीही बनावट असल्याचं बृहन्मुंबई शिक्षणाधिकार्‍यांनी लेखी दिलंय

आपल्या वडिलांची जात पंजाबमध्ये बदलता येत नाही, यामुळे महाराष्ट्रात राजकीय वजन वापरून जन्म आणि जात बदलण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप होतोय. हरभजन कुंडलेस या एकाच व्यक्तीचा तीन गावात जन्म कसा होऊ शकतो? त्याला सर्व ठिकाणी प्रमाण पत्र कशी मिळतात. ती मिळवताना राजकीय दबाव होता हे उघड आहे.

नवनीत कौर यांच्या वडिलांना 30 जुलै 2013 च्या दिवशी जात प्रमाणपत्र मिळालं. या बनावट आधारावर नवनीत कौर यांनी 30 ऑगस्ट 2013 ला जात प्रमाणपत्राचा अर्ज केला. या अर्जाची व्हॅलिडिटी करताना आपण चेतना कॉलेजमध्ये ज्युनिअर क्लार्क या पदावर नोकरीला असल्याचं प्रमाणपत्र जोडलंय. जातपडताळणी समितीनं शहानिशा न करताच जातवैधता ठरवल्याचं उघड झालंय. याबद्दल नवनीत कौर यांची उत्तरं चक्रावून टाकणीर आहेत.

यापूर्वीही अनेक उमेदवारांनी आपली जात प्रमाणपत्रं खोटी माहिती देऊन तयार करून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यांच्या निवडणुकाही रद्द झाल्या आहे. आता मुलुंड कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत पण जात पडताळणी समितीनं यासंदर्भातला अंतिम निर्णय 12 मार्च रोजी राखून ठेवलाय. त्यामुळे हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल आला तर नवनित राणा कुंडलेस यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2014 11:03 PM IST

ताज्या बातम्या