लोकसभा लढू नका, गडकरींचं मनसेला आवाहन

लोकसभा लढू नका, गडकरींचं मनसेला आवाहन

  • Share this:

raj and gadkari03 मार्च : भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात बदलाचे संकेत मिळत आहे. आज (सोमवारी) झालेल्या गुप्त बैठकीत मनसेनं लोकसभेची निवडणूक लढवू नये असं आवाहन नितीन गडकरी यांनी राज यांना केल्याचं कळतंय.

काँग्रेसविरोधी मतांचं विभाजन नको म्हणून गडकरींनी मनसेला आवाहन केलंय. तसंच मनसेला महायुतीत आणण्याचा गडकरी प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. तर राज ठाकरे महायुतीत येत असतील तर आपल्याला अडचण नाही, त्यांचं महायुतीत स्वागत करू असं आरपीआयचे नेते रामदास आठवले म्हणाले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. महायुतीत नवा गडी घेणार नाही असं महायुतीच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केलंय.

मात्र राज-गडकरींची असलेली मैत्री लक्षात घेता या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी या बैठकीला दुजोरा दिलाय. नितीन गडकरी आणि राज ठाकरे काँग्रेसमुक्त भारताविषयी चर्चा करण्यासाठी एकमेकांना भेटले, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, राज ठाकरे आणि गडकरी यांच्या भेटीमुळे शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.  लोकसभा उमेदवार निवडीसाठी महायुतीच्या नेत्यांची शिवसेना भवनात बैठक संपली. पण उद्धव ठाकरे या बैठकीला गेले नाहीत. नाराज झालेल्या शिवसेना नेत्यांनी उद्धव यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आणि राजनाथ सिंहांकडे याप्रकरणी तक्रार करावी, असा आग्रह धरलाय.

 

First published: March 3, 2014, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading