चोरी, लिफ्ट आणि खून !

चोरी, लिफ्ट आणि खून !

  • Share this:

2346istar anuhaya case03 मार्च : इस्थर अनुह्या खून प्रकरणाचं गूढ अखेर उकललंय. चोरीच्या उद्देशासाठी आपण टॅक्सी ड्रायव्हर असून 300 रुपयात घरी सोडतो असं सागून आरोपी चंद्रभान सानपनं इस्थरचा खून केला हे उघड झालं आहे. सानपला नाशिकहून कांजूरमार्ग पोलिसांनी अटक केलीय. त्याला 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. चोरीच्या उद्देशासाठी निष्पाप इस्थरचा खून झाल्याचं उघड झालंय.

अनुह्या इस्थर (वय 23) ही मुळची आंध्रप्रदेशची. मुंबई गोरेगाव इथं टीसीएस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनअर म्हणून काम करत होती. अंधेरीतील एका हॉस्टेलमध्ये ती राहत होती. नाताळाच्या सुट्टीनिमित्त अनुह्या आपल्या गावी आंध्रप्रदेशला गेली होती. 4 जानेवारी रोजी अनुह्या विशाखपट्टणम एक्स्प्रेसने मुंबईला निघाली. पण दुसर्‍यादिवशी ती हॉस्टेल अथवा कंपनीवर पोचलीच नाही.

त्यामुळे तिच्या चुलत भावाने इस्थर हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. सर्वत्र शोधा-शोध घेतला पण इस्थरचा काही शोध लागला नाही. अखेर तिच्या मृतदेह 16 जानेवारी रोजी कांजूरमार्ग येथील एक्स्प्रेस हायवेजवळ झुडपांमध्ये जळालेल्या, कुजलेल्या अवस्थेत आढळलाय. तिच्या हातातील अंगठीवरुन तिच्या नातेवाईकांनी ओळख पटवली. तेव्हापासून इस्थरच्या मृत्यूचा तपास पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 36 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचं फूटेज तपासलं आणि त्याआधारेच खुनाचा छडा लावला. ही घटना घडली त्यादिवशीचं कुर्ला स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय.

त्यात इस्थर अनुह्या सोबत कुर्ला टर्मिनसवर एक अनोळखी व्यक्ती दिसत होती. इस्थर 5 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवर पहाटे पाच वाजता उतरली होती. त्यादिवशीच्या स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजमध्ये इस्थर सोबत एक 35 ते 40 वयातील एक व्यक्ती दिसली होती. या व्यक्तीने इस्थरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली होती. हा व्यक्ती आरोपी चंद्रभान सानप होता. खुनाच्या रात्री इस्थर कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर सानपनं इस्थरला 300 रुपयांत घरी सोडेन असं सांगितलं. मात्र सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल असल्याचं लक्षात आल्यावर इस्थरनं नकार दिला. त्यावर आपला मोबाईल नंबरही घेऊन ठेवा, असं म्हणत इस्थरला सानपनं राजी केलं. सुरुवातीला आपला उद्देश केवळ चोरीचा होता. मात्र नंतर आपलं मन बदललं, अशी कबुली सानपनं दिली. हे फक्त प्राथमिक निष्कर्ष आहेत,असं पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केलंय.

 

घटनाक्रम

- 23 वर्षांची अनुह्या इस्थर मूळची आंध्रप्रदेशतल्या-मच्छिलीपट्टणमची

- आयटीमध्ये नोकरी करायची

- अंधेरी इथं होस्टेलमध्ये राहत होती

- 4 जानेवारीला विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वेनं विजयवाडा इथून ती सकाळी साडेसात वाजता निघाली

- त्याच दिवशी सकाळी साडे आठ वाजता ती वडिलांसोबत बोलली

- 5 जानेवारीला ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचली पण होस्टेलला पोचली नाही

- ती मुंबईत पोहोचली तेव्हा तिच्याकडे दोन मोबाईल फोन होते

- 5 जानेवारीला दुपारी 3 वा. तिच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन भांडुप इथं आढळून आलं

- 16 जानेवारीला तिचा मृतदेह कांजूरमार्गमध्ये सापडला

- तब्बल दोन महिन्यानंतर 3 मार्च रोजी इस्थर अनुह्या खुनाचं गुढ उकललं

- आरोपी चंद्रभान सानपला कांजूरमार्गमधून अटक

First published: March 3, 2014, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading