01 मार्च : भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर आरोप करणार्या आम आदमी पार्टीच्या सदस्या आणि लोकसभेच्या उमेदवार अंजली दमानिया अडचणीत सापडल्या आहेत. पूर्ती पॉवर ऍन्ड शुगर लिमिटेडने 'आप'च्या लोकसभेच्या उमेदवार अंजली दमानिया यांच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दमानिया यांच्या विरोधात पूर्तीची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा तसंच जनेतील सौहार्द बिघडू नये याकरिता प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दमानियांनी आज पाठवलेल्या फाईलीत उल्लेख करण्यात आलेल्या श्यामराव सातपुते हा पूर्तीचा भागधारक असून त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड पंतप्रधान कर्जमाफी योजनेअंतर्गत झाली असेल पण त्यांचा बँकेशी संबध आहे पूर्तीशी नाही असं पूर्ती साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक दिवे यांनी स्पष्ट केलं.
पूर्ती साखर कारखान्यातर्फे ऊस ऊत्पादक शेतकर्याला मिळवून दिलेले कर्ज पंतप्रधान कर्जमाफीतून माफ करूनही शेतकर्याकडून वसूल करण्यात आल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता याबाबत दमानियांनी आज नितीन गडकरी यांच्या घरी भ्रष्टाचारासंदर्भातील पुराव्याची फाईल पाठवली. गडकरींच्या घरी त्यांच्या पीएने ही फाईल स्विकारली आहे. नितीन गडकरी यांनी आपल्याविरोधात कुणी एक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध केलं तर आपण राजकारण सोडून देवू असं सांगितलं होतं.